'रासप'ला आलेत अच्छे दिन - महादेव जानकर

परशुराम कोकणे
बुधवार, 18 जानेवारी 2017

भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत मित्र पक्षाचा धर्म पाळायला हवा. जनतेच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 
- महादेव जानकर, पक्षाध्यक्ष, पशुसंवर्धन मंत्री 

सोलापूर - महाराष्ट्रासह गुजरात, बंगळूर, आसाममधील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांना जनतेने स्वीकारले आहे. राज्यात पाचव्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळाली आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून बोलावणं नाही आलं तर स्वबळावर लढणार आहोत असे सांगताना राष्ट्रीय समाज पक्षाला "अच्छे दिन' आल्याचा विश्‍वास पक्षाध्यक्ष, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला. 

महापालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर "सकाळ'ने जानकर यांच्याशी संवाद साधला. राज्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला जनतेने स्वीकारले आहे. राज्यात आमच्या पक्षाचे दहा जिल्हा परिषद सदस्य आहेत, तीस नगरसेवक आहेत, दोन ठिकाणी नगराध्यक्ष आहेत, दोन आमदार आहेत. गुजरातमधील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या सदस्यांनी विजय संपादन केल्याचे सांगून श्री. जानकर म्हणाले, "उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत आम्ही शंभर जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. उत्तराखंडमध्ये चाळीस जागांवर आमची लढण्याची तयारी झाली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाला आता चांगले दिवस आले आहेत.' 

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महिला आणि तरुणांना संधी दिली जाणार असल्याचे श्री. जानकर यांनी सांगितले.

सोलापुरात हव्यात 32 जागा 
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाला किमान 32 जागा महायुतीकडून मिळायला हव्यात. सन्मानाने जागा नाही मिळाल्या तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहोत असे पक्षाध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले. 

भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत मित्र पक्षाचा धर्म पाळायला हवा. जनतेच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 
- महादेव जानकर, पक्षाध्यक्ष, पशुसंवर्धन मंत्री