महाजन, निलंगेकर, पाटील, तावडेंचा भाव वधारणार?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

मुंबई - महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिलेल्या जबाबदाऱ्या चोख सांभाळत भाजपला यश मिळवून दिल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन, संभाजी निलंगेकर, डॉ. रणजीत पाटील यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूष आहेत. हे सर्व मंत्री फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. या मंत्र्यांबरोबरच मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांचाही भाव मुंबई महापालिका निवडणुकीतील भाजपच्या यशाने वधारला आहे.

नाशिक महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे भाजपने सोपवली होती. मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांना टक्‍कर देत महाजन यांनी पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले. त्यामुळे महाजन यांचे पक्षातील वजन वाढले आहे.

लातूरमध्ये कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांनी लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला यश मिळवून दिले आहे. त्यांनी कॉंग्रेसच्या अमित देशमुख यांच्याकडून लातूर जिल्हा परिषद हिसकावून घेतली आहे. अमरावती महानगरपालिकेत राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी भाजपची सत्ता आणली आहे. या मंत्र्यांच्या कामगिरीने मुख्यमंत्री भलतेच खूष असून, मंत्रिमंडळात खांदेपालटाची वेळ आल्यानंतर या तिघांच्या कामगिरीचा नक्‍कीच विचार केला जाणार असल्याचे सांगण्यात येते.

तावडे यांचा भाव वधारला
विनोद तावडे हे मधल्या काळात "बॅकफूट'वर गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. आपल्या पदवीचा वाद उफाळून आल्यानंतर शांत बसलेले तावडे मुंबई महापालिका निवडणुकीतील यशाने सुखावले आहेत. मुंबई उपगनरमध्ये भाजपचे तब्बल 41 नगरसेवक निवडून आले आहेत. पालकमंत्री या नात्याने तावडे यांच्याकडे विजयाचे श्रेय जाते. त्यामुळे भविष्यात तावडे यांचाही भाव वधारणार आहे.

Web Title: mahajan, nilangekar, patil, tawade demand increase