आनंद देण्याचं काम सुरूच ठेवा...!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

अमिताभ बच्चन, बिग बी पंचाहत्तरी पूर्ण करताहेत. ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून एक काळ गाजवलेला हा अभिनेता ‘ग्रेसफुली एजिंग’ नेमकं कसं असतं हे दाखवून देतोय. चित्रपटसृष्टीतल्या त्यांच्या दीर्घ प्रवासात त्यांच्यासोबत असलेले त्यांचे खासगी मेकअपमन दीपक सावंत सांगताहेत अमिताभच्या न संपणाऱ्या जादूविषयी...

अमिताभ बच्चन, बिग बी पंचाहत्तरी पूर्ण करताहेत. ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून एक काळ गाजवलेला हा अभिनेता ‘ग्रेसफुली एजिंग’ नेमकं कसं असतं हे दाखवून देतोय. चित्रपटसृष्टीतल्या त्यांच्या दीर्घ प्रवासात त्यांच्यासोबत असलेले त्यांचे खासगी मेकअपमन दीपक सावंत सांगताहेत अमिताभच्या न संपणाऱ्या जादूविषयी...

अँग्री यंग मॅन म्हणून ज्या चित्रपटाने अमिताभला ओळख दिली, त्या जंजीरच्या वेळची गोष्ट. दीपक होतकरू रंगभूषाकार होता. त्याचं काम अमिताभला आवडलं. अमिताभ यांचा खासगी मेकअपमन होण्याची संधी मग त्याच्यासमोर चालून आली. दीपकनी ती स्वीकारलीच आणि सुरू झाला अमिताभ बच्चन यांचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट म्हणून दीपक यांचा प्रवास. या गोष्टीला जवळजवळ ४५ वर्षे झालीत. आज दीपक ६९ वर्षांचे आहेत, तरीही ते तेवढ्याच उमेदीने आणि उत्साहाने अमिताभ यांच्याबरोबर काम करताहेत.

अमिताभ बच्चन यांच्याबरोबरची आठवण सांगताना दीपक म्हणतात, ‘‘शोले’चं चित्रीकरण सुरू होतं. चित्रीकरणासाठीचं ठिकाण आणि निवासव्यवस्था यात अंतर होतं. एके दिवशी शूटिंग संपल्यावर मी, अमिताभ आणि जया बच्चन निघालो. एकाच गाडीतून. मी पुढच्या सीटवर होतो. जया आणि अमिताभ मागच्या सीटवर होते. मी गाडीत बसलो आणि पुढचा दरवाजा ओढून घेतला आणि अचानक अमिताभ जोरात ओरडू लागले, ‘माझा हात, माझा हात, गेला माझा हात...’

माझा ठोकाच चुकला. जया बच्चनही गांगरून गेल्या. कोणाला काही कळेचना की झाले तरी काय? मी घाईघाईने कारचा दरवाजा उघडला. बाहेर पडलो आणि घाबरत घाबरतच मागचा दरवाजा उघडला. तर ते जोरजोरात हसत होते. मला आधी कळेच ना काही. मग लक्षात आलं, की तो मला उल्लू बनवण्याचा प्रयत्न होता. असा हा मिश्‍कील माणूस!’’

‘‘ते माणूस म्हणून इतके चांगले आहेत, की मी नेहमी त्यांच्याकडून काही ना काही शिकत असतो. ते आज ७५ वर्षांचे असूनही त्याच उमेदीने काम करतात. मला आठवते, की ते जसे ४५ वर्षांपूर्वी सीनची तयारी करायचे, तशीच तयारी ते आजही करतात. असं वाटतच नाही, की ते ७५ वर्षांचे आहेत. तितक्‍याच ताकदीने, तितक्‍याच असोशीने काम करतात ते. त्यांच्या त्या उत्साहाचा परिणाम आमच्यावरही होतो. मग मीही माझं वय विसरतो.’’

अमिताभ बच्चन यांच्याबरोबर त्यांच्या अधूनमधून गप्पा होत असतात. त्यातून त्यांना काही विचार मिळत असतात. त्याविषयी सांगताना दीपक म्हणतात, ‘‘एकदा सहज बोलता बोलता ते म्हणाले, माणसाने कधीही निवृत्त होऊ नये. वयानुसार सेवानिवृत्तीचे वय झाले, नोकरी सोडावी लागली, तरी सेवेची वृत्ती सोडू नये. काम करत राहावे. एक तर आपल्यासाठी ते चांगले आहे, कारण खाली दिमाग शैतान का घर होता है. दुसरं म्हणजे त्या कामातून आपण घरासाठी काही कमवत असतोच. आपल्या घराच्या प्रगतीबरोबरच आपण आपल्या देशाच्या प्रगतीलाही हातभार लावत असतो.’’

अमिताभ बच्चन यांचा स्वभाव अतिशय सेवाभावी आहे असं दीपक सांगतात, ‘‘अमिताभ कोणालाही मदत करायला मागे-पुढे पाहत नाहीत. आम्ही शूटिंगसाठी बाहेर जातो तेव्हा वाटेत असं कुणी दिसलं, ज्याला मदतीची गरज आहे... मग ते जनावर असो की व्यक्ती, ते मदत करणारच. त्याबद्दल कसला बडेजावही नाही. असा माणूस तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. त्यांच्या सोबत राहण्याने माझ्यातही अनेक सकारात्मक बदल झालेत. म्हणूनच मी आजतागायत त्यांच्याबरोबर काम करतोय, करत राहीन.’’
दीपक सावंत यांना अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करायला मिळतंय ही देवाचीच कृपा आहे असे वाटतं. ते गमतीने म्हणतातही, ‘‘जया बच्चनही त्यांच्याबरोबर एवढा वेळ राहत नसतील जेवढा वेळ मी त्यांच्याबरोबर असतो.’’

ते पुढे म्हणतात, ‘अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ४५ वर्षे काम केल्यानंतर माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला आहे. त्यांच्यासारखा लाखमोलाचा माणूस माझ्या आयुष्यात आला याबद्दल मी धन्यता मानतो.
ते एकदा म्हणाले होते, माझं माझ्या कामावर नितांत प्रेम आहे. त्यामुळे मला वाटतं, की मला मरण यावं ते काम करतानाच यावं... पण मला, मलाच काय त्यांच्या कुणाही चाहत्याला हेच वाटतं, की त्यांनी आणखी खूप वर्षं कार्यरत राहावं आणि आनंद वाटण्याचं त्यांचं उत्तम काम करतच राहावं!’’

ब्रिलीयन्स अनलिमिटेड@75
अमिताभ बच्चन डावखुरे असल्याचे सांगतात, पण प्रत्यक्षात ते त्यांच्या दोन्ही हातांनी छान लिहू शकतात. 
अमिताभना खरंतर  व्हायचं होतं इंजिनिअर, त्यानंतर एअरफोर्स जॉईन करण्याचाही त्यांचा विचार होता म्हणे. 
अमिताभ यांची पहिली कमाई होती... तब्बल तीनशे रुपये.
अमिताभ यांचं खरं आडनाव आहे श्रीवास्तव; पण त्यांचे वडील कवी. त्यांनी बच्चन हे उपनाव, टोपणनाव घेतलं होतं. तेच त्यांनी आडनाव म्हणून स्वीकारलं. मुळात त्यांच्या वडिलांना त्यांचं नाव इन्कलाब ठेवायचं होतं. पण नंतर त्यांना अमिताभ हेच नाव आवडलं. तेच त्यांनी ठेवलं. ज्याचा अर्थ आहे ब्रिलीयन्स अनलिमिटेड. जे अमिताभ यांनी सार्थ ठरवलं.

‘खुदागवाह’च्या चित्रीकरणावेळी अफगाणिस्तानच्या अध्यक्षांनी त्यांची अर्धी फौज अमिताभच्या संरक्षणासाठी पाठवली होती. हा सिनेमा पूर्ण झाला आणि रिलिज झाला तेव्हा  तो अफगाणिस्तानमध्ये सर्वात जास्त पाहिला गेलेला हा सिनेमा होता.  

अमिताभ यांची स्मरणशक्ती तेज आहे. त्यामुळे त्यांच्याजवळच्या नातेवाइकांचे वाढदिवस, आणि  काही खास दिवस त्यांच्या चांगलेच लक्षात राहतात. 

असं सांगतात की ‘मिस्टर इंडिया’साठी अमिताभच फर्स्ट चॉईस होता; पण त्या वेळी हा चित्रपट शेखर कपूर नव्हे तर प्रमोद चक्रवर्ती आणणार होते. 

अमिताभच्या वडिलांना वाटत होतं की, त्याच्या रूपाने त्यांच्या वडिलांचं (प्रताप नारायण श्रीवास्तव म्हणजे अमिताभच्या आजोबांचंच) पुनरागमन त्यांच्या कुटुंबात झालंय! 

एकाच महिन्यात चार चित्रपटांचं रिलिज आणि चारही सुपरहिट! ही किमया अमिताभने केलीय. गंमत म्हणजे त्यातल्या दोन चित्रपटांत त्याचा डबलरोल होता. ऑक्‍टोबर १९७८ मध्ये हा पराक्रम अमिताभने केला होता. या महिन्याच्या चारही शुक्रवारी अमिताभचे चार चित्रपट रीलिज झाले. मुकद्दर का सिकंदर, कस्मे वादे, डॉन आणि त्रिशूल हे ते चार चित्रपट होते! 

हिपॅटायटिस-बी विरोधातल्या मोहिमेच्या वेळी अमिताभने एक गौप्यस्फोट केला होता. हिपॅटायटिस बीमुळे त्यांचं ७५ टक्के यकृत निकामी झालं असून, सध्या फक्त २५ टक्के यकृत कार्यरत आहे. ‘जो भी है, उसीसेही काम चला रहा हूँ मैं’ हे त्याचे मिष्किल उद्‌गार होते, हे सांगताना! 

अमिताभचा पहिला चित्रपट १९६९ मध्ये आला होता. सात हिंदुस्थानी असं त्याचं नाव. त्यात अर्थातच सात हिंदुस्थान होते. पैकी एक हिंदुस्थानी होता अमिताभ; पण त्या मल्टिस्टार चित्रपटातही अमिताभने आपलं अस्तित्व दाखवून दिलं. त्याने उत्कृष्ट पदापर्णासाठी असलेला पुरस्कारही या सिनेमासाठी पटकावला होता.

(शब्दांकन- चिन्मयी खरे)