राष्ट्रपुरूषांच्या पुतळ्यांसाठी आता 'गणित'

टीम ई सकाळ
मंगळवार, 2 मे 2017

राष्ट्रपुरूषांचे, थोर व्यक्तींचे पुतळे हा केवळ भावनिक विषय नसतो. असे पुतळे त्या त्या परिसराची आयडेंटिटी बनतो. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वाधिक पुतळे आहेत. नवा पुतळा तो या महापुरूषांपैकीच कोणाचा असेल, तर स्थानिक प्रशासनाने संबंधित समुहाची कशी समजूत घालायची हा प्रश्न अंतराच्या मुद्द्याने चर्चेत येणार आहे.

मुंबई : राष्ट्रपुरूष/थोर व्यक्ती यांचे पुतळे उभा करताना त्याच व्यक्तीचा पुतळा दोन किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात आधी उभारलेला नाही, याची दक्षता घ्यावी अशी नवी सूचना राज्य सरकारने आज (मंगळवार) जारी केली आहे. 

नवा पुतळा बसवताना आधीचे पुतळे दोन किलोमीटरच्या हद्दीत आहेत की नाही, याची स्थानिक प्रशासनाला खात्री करून घ्यावी लागणार आहे. हे अंतर कुठले, हवाई की जमीनीवरचे, त्यावर आक्षेप असेल तर काय, याबाबत नव्या आदेशात स्पष्टीकरण नाही. 

गेल्या 17 वर्षांत महाराष्ट्र सरकारने पुतळ्यांसंदर्भात एकूण तीनदा नियमावली बनवायचा प्रयत्न केला. पहिल्यांदा रस्त्यांच्या बाजूला पुतळे बसवायला 2000 मध्ये मनाई केली. ती कितपत पाळली गेली, हा भाग वेगळा. त्यानंतर 2005 मध्ये 16 कलमी धोरण ठरविले गेले. त्याचे पालनही कधी झाल्याचे समजले नाही. 

नवे धोरण 21 कलमी आहे. आधीच्या धोरणात पुतळा बेकायदेशीररित्या बसवला असेल, तर दंडाची तरतूद होती. पूर्वपरवानगीशिवाय बसवलेले पुतळे हटविण्याची तरतूद नव्या धोरणात बेकायदेशीर आहे. 