महाराष्ट्र विचारवंतांना सुरक्षित वाटावाः हमीद

महाराष्ट्र विचारवंतांना सुरक्षित वाटावाः हमीद
महाराष्ट्र विचारवंतांना सुरक्षित वाटावाः हमीद

ज्येष्ठ विज्ञानवादी आणि समाजसुधारणेसाठी आयुष्य पणाला लावणाऱया डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 ऑगस्टला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. दाभोलकरांपाठोपाठ ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात आणि कन्नड विचारवंत एम एम कलबुर्गी यांची धारवाडमध्ये हत्या झाली आणि अवघा देश हादरला. तिनही हत्यांमागे धर्मांध विचारसरणीच्या संघटना असल्याचा आरोप गेल्या तीन वर्षांत सातत्याने होत राहिला; तथापि प्रत्यक्ष पोलिस तपासांत आजही ठोस प्रगती झालेली नाही. या पार्श्वभूमीवर दाभोलकर यांचा मुलगा हमीद यांनी मांडलेले विचारः

नरेंद्र दाभोलकर यांची हत्या हा काही एखाद्या व्यक्तीचा खून होता, असं मला कधीही वाटलं नव्हतं आणि आजही वाटत नाही. मीच नव्हे; समाजातल्या हजारो लोकांनी त्यावेळी आणि वेळोवेळी हीच भावना व्यक्त केली आहे. दाभोलकरांची हत्या हा विचारांच्या विरोधातील गुन्हा होता. या हत्येच्या तपासात काही निष्पन्न झालं असतं, आरोपींना पकडून, सुत्रधारांना पकडून शिक्षा केली असती, तर त्यानंतरच्या हत्या झाल्या नसत्या. मात्र, दाभोलकरांची हत्या ही विचारांविरोधातील गुन्हा होता, हे तपास यंत्रणांनी कधी मान्यच केले नाही. कुटुंब, वैयक्तिक हेवेदावे अशा पारंपरिक पद्धतीनं पोलिसांनी तपास केला. त्याचा परिणाम म्हणजे आजही मारेकरी आणि सूत्रधार मोकाट आहेत. 

दाभोलकरांच्या हत्येच्या तपासावेळी 45 पथकं स्थापन केलीत वगैरे असं पोलिसांकडून सांगितलं गेलं. मला वाटतं, इतक्या मनुष्यबळाची काहीही आवश्यकता नव्हती. ज्या संस्थांवर कारवाईची मागणी आम्ही करत होतो, त्या संस्थांचा इतिहास हिंसक होता. त्यांच्यावर वेळीच कारवाई केली गेली असती, तर आरोपी पकडले गेले असते. ते घडले नाही. ते धाडस पोलिसांमध्ये नव्हतं. आजही आरोपींपर्यंत पोहोचण्याचं धाडस तपास यंत्रणांमध्ये आहे, असं मला वाटत नाही. तपासामध्ये आतापर्यंत जी काही प्रगती झालीय, ती फक्त न्यायालयाच्या आदेशांमुळे. न्यायालय तपासावर देखरेख ठेवून आहे. तरीही तपास लॉजिकल कन्क्लूजनपर्यंत पोहोचलेला नाही. इतका रेटा असूनही तपास लागत नस्ले, तर विचारांना धोका कायम राहणार आहे. त्यातून तपास यंत्रणांमधला फोलपणा दिसून येतो आहे. या फोलपणामुळेच, दाभोलकरांना पुलावर मारणारे मारेकरी पानसरेंच्या हत्येसाठी त्यांच्या घराजवळ पोहचू शकले आणि कलबुर्गींच्या हत्येसाठी दारात. अशा परिस्थितीत सामान्य लोकांना अस्वस्थ, असुरक्षित वाटणं स्वाभाविक आहे. दाभोलकर-पानसरे-कलबुर्गींना न्याय मिळत नसेल, तर आपलं काय असा विचार लोकांनी केला, तर तो चुकीचा ठरत नाही. 

गोव्याच्या मडगाव बॉम्बस्फोटातील फरार आरोपींची नावं तिन्ही प्रकरणात सातत्यानं समोर आली आहेत. तथापि, त्यांना पकडण्यासंदर्भात कधी काही हालचाल झालेली नाही. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए)ची मदत तपास यंत्रणांनी घेतली, तर तपासात अधिक उपयोगी ठरेल, असं आम्हाला वाटतं. राज्य आणि केंद्र सरकारनं या संदर्भानं पाहिलं पाहिजे. 

महाराष्ट्र विचारवंतांना सुरक्षित वाटला पाहिजे. स्वतंत्र विचार मांडणाऱयांना सुरक्षित वाटावं, ही सरकारची जबाबदारी आहे. ती सरकारनं पूर्ण केली पाहिजे. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना कोणी उठून ‘मॉर्निंग वॉक‘ला जाण्याचा सल्लावजा धमकी देतो आणि सरकार काही कारवाई करत नाही. दाभोलकर आणि पानसरेंच्या हत्या मॉर्निंग वॉकच्या वेळी झालेल्या आहेत हा संदर्भ बाजूला ठेवला जातो. हे थांबलं पाहिजे.  

याच काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं दाभोलकरांचं कार्य आणखी पुढं नेलं आहे. अंनिसचा एकही कार्यक्रम गेल्या तीन वर्षांत रद्द झाला नाही. ‘डॉक्टरांनंतर अंनिसचं काय होणार,‘ हा प्रश्न महाराष्ट्रात आज विचारला जात नाही, हे अंनिसच्या कार्यकर्त्यांचं यश आहे. जातपंचायत  आणि जादुटोणाविरोधी कायदा महाराष्ट्रानं याच काळात संमत केला. या दोन्ही कायद्यांसाठी डॉक्टरांनी तीन दशकं चळवळ चालवली होती. अंनिसचं कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गेल्या तीन वर्षांत सातत्यानं प्रयत्न केले. 300-350 प्रकरणं केवळ अंनिसच्या कार्यकर्त्यांनी दाखल केली. इतर राज्यांमध्येही आता अशा कायद्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 

डॉक्टरांच्या हत्येचा निषेध समाजातल्या विचारशील लोकांनी भारतीय संविधानाच्या चौकटीतच केला. कधी एक काच कुठं फुटली नाही. प्रत्येकाचे निषेधाचे मार्ग वेगळे; परंतु संविधानिक होते. दाभोलकरांची हत्या ज्या पुलावर झाली, तिथं दर महिन्याच्या 20 तारखेला गेली 36 महिनं माणसं जमतात आणि हत्येचा निषेध करतात. अतुल पेठेंचं रिंगण नाटक पाचशेहून अधिक प्रयोग महाराष्ट्रभर करते आहे. डॉक्टरांनी 2000 मध्ये सुरू केली शनिशिंगणापूर मंदिर प्रवेशाची चळवळ निर्णयापर्यंत पोहोचली आणि मंदिरात महिलांना प्रवेश मिळाला. गेल्या वर्षी पुण्यातल्या मानाच्या पाच गणपतींचं हौदात विसर्जन झालं. 25 वर्षांपूर्वी याचसाठी दाभोलकरांनी कोल्हापुरातून चळवळ सुरू केली होती. साधना प्रकाशनाचा बालकुमारांसाठीचा अंक गेल्या वर्षी 3 लाख कुटुंबांपर्यंत गेला आणि आम्ही 25 हून अधिक पुस्तकं प्रकाशित केली आहेत. 

माणसं मारून विचार संपवता येतात, असं वाटणाऱयांना हे कार्य म्हणजे सणसणीत चपराक आहे. मारेकऱयांच्या गोळ्यांना आमचं काम हेच उत्तर आहे. फुले-शाहू-आंबेडकर...आम्ही सारे दाभोलकर ही फक्त घोषणा राहिलेली नाही. ती आता कृती बनलेली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com