राणेंचे संभाव्य विरोधी पक्षनेतेपद हुकले 

शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मुंबई -  कॉंग्रेस सोडण्याचा नारायण राणे यांनी घेतलेला निर्णय त्यांच्यासाठी तोट्याचा ठरण्याची शक्‍यता आहे. राणे कॉंग्रेसमध्येच राहिले असते, तर त्यांची विधान परिषदेतील आमदारकी 2022 पर्यंत शाबूत राहिली असती आणि त्याहीपेक्षा जून - जुलै 2018 मध्ये विधान परिषदेतील 21 जागा रिक्‍त होताना कॉंग्रेसचे संख्याबळ राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा अधिक राहण्याची शक्‍यता होती. परिणामी, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसकडे चालून येणार होते आणि राणे यांना ते सहजपणे मिळाले असते, अशी माहिती विधान मंडळ सचिवालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मुंबई -  कॉंग्रेस सोडण्याचा नारायण राणे यांनी घेतलेला निर्णय त्यांच्यासाठी तोट्याचा ठरण्याची शक्‍यता आहे. राणे कॉंग्रेसमध्येच राहिले असते, तर त्यांची विधान परिषदेतील आमदारकी 2022 पर्यंत शाबूत राहिली असती आणि त्याहीपेक्षा जून - जुलै 2018 मध्ये विधान परिषदेतील 21 जागा रिक्‍त होताना कॉंग्रेसचे संख्याबळ राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा अधिक राहण्याची शक्‍यता होती. परिणामी, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसकडे चालून येणार होते आणि राणे यांना ते सहजपणे मिळाले असते, अशी माहिती विधान मंडळ सचिवालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेवर आलो, असे गृहीत धरले, तरी राणे 2022 पर्यंत विरोधी पक्षनेतेपदावर कायम राहिले असते. 

जून - जुलै 2018 मध्ये विधान परिषदेतील 21 जागा रिक्‍त होत आहेत. यात विधानसभा सदस्यांतून निवडून द्यावयाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चार, कॉंग्रेसच्या तीन, भाजपच्या दोन, शिवसेना आणि शेकापची प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. विधानसभेत भाजपचे 122, शिवसेना 63, कॉंग्रेस 42, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस 41 असे पक्षीय बलाबल आहे. या निवडणुकीत साडेसव्वीस किंवा सत्तावीस मतांचा कोटा गृहीत धरल्यास कॉंग्रेस दोन, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसची एक जागा निवडून येऊ शकते. कारण गेल्या वेळी कॉंग्रेसने राष्ट्रवादीसाठी हात सैल केल्याने त्याची परतफेड म्हणून राष्ट्रवादीकडील अतिरिक्‍त मतांच्या जोरावर दुसरी जागा कॉंग्रेसला मिळण्याची शक्‍यता आहे. तसेच भाजपच्या तीन, तर शिवसेनेच्या पारड्यात एक अशा जास्त जागा पडण्याची शक्‍यता आहे. 

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर लक्ष टाकले असता, नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून जयवंतराव जाधव, कोकणातून अनिल तटकरे आणि परभणीतून बाबाजानी दुर्रानी पुन्हा निवडून यण्याबाबत शंका उपस्थित केली जाते. कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसला आहे. त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीत लातूर स्थानिक स्वराज मतदारसंघ कॉंग्रेसकडून गेला तरी कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिक नुकसान होणार आहे. त्यामुळे जुलै 2018 मध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसकडे येणार असल्याने त्यावर राणे यांची बिनविरोध निवड झाली असती, अशी शक्‍यता विधान मंडळातील अधिकाऱ्याने वर्तविली. 

दरम्यान, या निवडणुकीत विधान परिषदेतील संख्याबळ बदलणार असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा भाजपचे संख्याबळ जास्त होईल. परिणामी, सभापतिपद भाजपकडे जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

विधान परिषदेतील सध्याचे संख्याबळ 
पक्ष सध्याची संख्या जुलै 2018 मध्ये संभाव्य संख्याबळ 
....................................................................................................
राष्ट्रवादी कॉंग्रेस 23 17 
कॉंग्रेस 20 18 
भाजप 17 19 
शिवसेना 9 10