कृषी प्रक्रिया उद्योगासाठी समृद्धी महामार्ग वरदान 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 22 जुलै 2017

मुंबई - फळ आणि अन्नप्रक्रिया उद्योगासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर संधी आहे. मध्य आशियातील देशांकडून महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी विचारणा होत आहे. जागतिक बाजारपेठेला राज्यात मोठी संधी असून, अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहील, अशी ग्वाही देत मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग कृषी प्रक्रिया उद्योगासाठी वरदान ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. 

केंद्रीय अन्नप्रक्रिया विभागामार्फत नवी दिल्ली येथे तीन ते पाच नोव्हेंबरदरम्यान "वर्ल्ड फूड इंडिया 2017' होणार आहे. जागतिक स्तरावरील या प्रदर्शनात राज्यांनी सहभागी व्हावे, यासाठी या क्षेत्रातील गुंतवणूकदारांना माहिती देण्यात येत आहे. त्याची सुरवात महाराष्ट्रापासून झाली आहे. हॉटेल ताज विवांतमध्ये या उपक्रमासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल, राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आदी या वेळी उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले, की शाश्वत शेतीसाठी अन्नप्रक्रिया उद्योग महत्त्वाचा घटक ठरत आहे. अन्नप्रक्रिया उद्योग विकासात भर घालत असून, या क्षेत्रात अमाप संधी आहे. समृद्धी महामार्गाने मुंबई आणि नागपूर ही दोन्ही महानगरे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे 24 जिल्हे एकमेकांशी जोडली जाणार असून, कृषिप्रक्रिया उद्योगांची साखळीच या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे. 

हरसिमरत कौर म्हणाल्या, की आपला देश अन्नधान्य आणि दूध उत्पादनात जागतिक स्तरावर अग्रेसर आहे. देशात सुमारे एक लाख कोटीचे अन्न वाया जाते. ही खेदाची बाब असून अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून अन्न वाया जाण्याचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. 

महाराष्ट्रातील प्रकल्प 
महाराष्ट्रात वाहेगाव (औरंगाबाद), देवगाव (सातारा), सिंधीविहिरी (वर्धा) या तीन ठिकाणी मेगा फूड पार्क मंजूर झाले आहेत. सातारा येथील फूड पार्क लवकरच कार्यान्वित होणार आहे, तर अन्य दोन फुड पार्कचे काम प्रगतिपथावर आहे. देशात 238 एकात्मिक शीतसाखळी प्रकल्प मंजूर आहे, त्यापैकी महाराष्ट्रात 50 प्रकल्प मंजूर करण्यात आले असून, 24 प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तर 26 प्रकल्प प्रगतिपथावर आहेत.