ठाकरेंनी उद्धटपणा करू नये - किरीट सोमय्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

पालिकेतील पक्षीय बलाबल 
- शिवसेना अपक्षांसह - 88 
- भाजप आणि दोन अपक्ष - 84 
- कॉंग्रेस - 30 
- राष्ट्रवादी कॉंग्रेस - 9 
- मनसे - 7 
- सप - 6 
- एमआयएम -2 

मुंबई - भांडुप येथील पोटनिवडणुकीतील विजयानंतर भाजपने पुन्हा एकदा थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य केले. मुंबईत महापौर भाजपचा होणार असून उद्धव ठाकरे यांनी उद्धटपणा करू नये, असा इशाराच खासदार किरीट सोमय्या यांनी दिला; तर पंचांग फाडून फटाक्‍यांचे राजकारण करून मत मिळत नाही, असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष ऍड. आशीष शेलार यांनी लगावला. 

मुंबईच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेचा पराभव झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या विजयानंतर भाजपने थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढविला. विकासाचा नेहमीच विजय होतो. महापालिकेच्या राजकारणात काही संकेत यापुढे स्पष्ट होत आहेत. विकासाच्या संकेतानुसार यापुढेही काम करत राहू. दुसऱ्यांना शिव्या देऊन मते मिळत नाहीत, असा टोला ऍड. शेलार यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. सोमय्या यांनी, उद्धव ठाकरे यांनी उद्धटपणा करू नये, असा थेट हल्ला चढवला. महापौर निवडून आणण्यापेक्षा पालिकेतील माफिया राज संपवणे आमचे ध्येय असून ते नक्कीच संपवू, असा टोलाही त्यांनी ठाकरे यांना लगावला. 

माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त असून महापालिकेत सध्या 226 नगरसेवक आहेत.