राणेंचे भवितव्य फडणवीसांच्या हाती

मृणालिनी नानिवडेकर
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

मुंबई  - कॉंग्रेसचा राजीनामा दिलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे राजकीय वाटचालीची आगामी दिशा ठरविण्यासाठी दिल्लीकडे निघणार असतानाच भाजपश्रेष्ठींनी त्यांच्याबाबत काय करायचे, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवावे, असे सांगितले असल्याचे समजते. राणे यांच्या संभाव्य प्रवेशाबाबत मुख्यमंत्री पूर्णत: अनुकूल नाहीत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच आज दुपारी राज्यातील भाजपचे क्रमांक दोनचे नेते चंद्रकांत पाटील यांनी राणे यांची दक्षिण मुंबईतील कार्यालयात भेट घेतली. आपण राणे यांना खाते देण्याचे विधान केले नव्हते, असे पाटील यांनी आज नमूद केले.

मुंबई  - कॉंग्रेसचा राजीनामा दिलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे राजकीय वाटचालीची आगामी दिशा ठरविण्यासाठी दिल्लीकडे निघणार असतानाच भाजपश्रेष्ठींनी त्यांच्याबाबत काय करायचे, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवावे, असे सांगितले असल्याचे समजते. राणे यांच्या संभाव्य प्रवेशाबाबत मुख्यमंत्री पूर्णत: अनुकूल नाहीत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच आज दुपारी राज्यातील भाजपचे क्रमांक दोनचे नेते चंद्रकांत पाटील यांनी राणे यांची दक्षिण मुंबईतील कार्यालयात भेट घेतली. आपण राणे यांना खाते देण्याचे विधान केले नव्हते, असे पाटील यांनी आज नमूद केले. ही भेट संपते न्‌ संपते तोच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही आज सायंकाळी राणे यांची आवर्जून भेट घेतल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही त्यांच्यासमोर प्रवेशाचा प्रस्ताव ठेवला नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

आमदारकीचा राजीनामा देताना राणे यांनी कॉंग्रेस, शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले असले, तरी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दल कोणतेही अनुदार उद्‌गार काढलेले नाहीत, हे विशेष. 

नागपूर, औरंगाबाद, नाशिक अशा महाराष्ट्रातील मुख्य शहरांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करण्याचा निर्धार राणे यांनी घोषित केला असला तरी प्रत्यक्षात ते येत्या एक-दोन दिवसांत दिल्लीला जाणार आहेत, असे समजते. सिंधुदुर्गात भव्य रुग्णालय उभारायचे असून, त्यासाठी परवानगी देणे, तसेच उद्‌घाटनाला येण्याच्या निमंत्रणासाठी आपण भाजप नेते अमित शहा यांची भेट घेणार आहेत, असे राणे यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी या उद्‌घाटनाला हजर राहावे, अशीही राणेंची इच्छा आहे. त्यांचे भाजपमध्ये जाणे निश्‍चित असल्याचे काही निकटवर्तीय सांगत असले, तरी भाजपमधून मात्र अद्याप या संदर्भात कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

राणे यांच्या प्रवेशाचा मुद्दा प्रतिष्ठेचा करत शिवसेना सरकारला "जय महाराष्ट्र' करणार काय, यावर विचार करणे आवश्‍यक असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जाते आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे शिवसेनेबद्दल फार अनुकूल मत नाही, असे मानले जाते. राणे यांचा पक्षवाढीला उपयोग होत असेल तर तो करावा, असे त्यांच्याशी प्रारंभापासून उत्तम संबंध असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत आहे. मात्र, या संबंधातला निर्णय महाराष्ट्रातील भाजपनेत्यांनी घ्यावा, असेही त्यांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळेच राणेंच्या दिल्लीवारीत शहा नेमका काय कौल देतील, याची उत्सुकता आहे. 

शहा यांच्याशी उत्तम संबंध असलेल्या पाटील यांनी आज राणेंची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यानिमित्त नागपुरात होते. ते परदेश दौऱ्यावर जाणार आहेत, त्यांच्या परतीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याचीही चर्चा आहे. राणे यांना त्यात खाते दिले जाईल, असे मानले जाते.