'चंद्रकांत पाटील यांना घरचा आहेर'

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले यांनी आज पुन्हा शेतकरी प्रश्‍नावरून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात संताप व्यक्‍त करत घरचा अहेर दिला. कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवातीलाच आम्ही विरोध केलेला असतानाही आता ऑनलाईन मध्येही बनावट शेतकरी असल्याचा दावा करणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्‍तव्याची चीड येते. कृपा करून शेतकऱ्यांना बनावट संबोधून चिड निर्माण करू नका, असा सबुरीचा सल्लाही पटोले यांनी या वेळी सरकारला दिला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर मंत्रालयात पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते. मुख्यमंत्री माझे चांगले मित्र आहेत. मात्र त्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याच्या निर्णयाला मी विरोध केला होता. माझा मित्र चुकत असेल तर मला बोलण्याचा अधिकार आहे, असे स्पष्ट करताना मुख्यमंत्र्यांनी कारभारात सुधारणा करून राज्याचे भले करावे, अशी भावनाही त्यांनी या वेळी व्यक्‍त केली. 

यामध्ये माझे कोणतेही कटकारस्थान किंवा राजकारण नाही. शेतकरी हीच माझी जात व धर्म आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या हितासाठी मी बोलण्यास घाबरत नाही. शेतकऱ्यांसोबत धोका होत असेल तर मी ताठर भूमिका घेणारचं, असेही पटोले यांनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्री यांनीही बनावट शेतकऱ्यांची आकडेवारी उपलब्ध झाली नसून चंद्रकांत पाटील यांच्या वक्‍तव्याबाबत नाराजी व्यक्‍त केल्याची माहिती पटोले यांनी दिली. 

मी समोरून लढतो 
बेधडक वक्‍तव्यामुळे पक्षांतर्गत नाराजी किंवा कारवाईची भीती वाटत नाही काय, या प्रश्‍नावर नाना पटोल म्हणाले की, "मी समोरून लढतो. नाही पटले तर सोडून जातो. जनतेनं मला लढण्यासाठी निवडणून दिले आहे. मला कोणाच्या आशीवार्दाने नेतृत्व मोठे होते, यावर विश्‍वास नाही. स्वकर्तृत्वाने नेतृत्व घडत असते. 

ओबीसी नेत्यांवर अन्याय ही परंपरा 
ओबीसी नेत्यांवर अन्याय करणे, ही या राज्याची परंपरा आहे. हाच इतिहास असल्याचा दावाही पटोले यांनी केला. इतिहासात ज्योतिबा फुले, सावित्रीबाई यांच्यावरही या महाराष्ट्रातच अन्याय झाला होता. त्यांना त्रास दिला होता. आजही तीच परंपरा सुरू आहे. यामध्ये नवीन काही नाही. या प्रवृत्ती महाराष्ट्रात नवीन नाहीत, हे मेधा खोले यांच्या प्रकरणावरून सिद्ध होते, असा टोलाही पटोले यांनी लगावला.