कोळसापुरवठ्याची स्थिती नोव्हेंबरमध्ये सुधारेल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

मुंबई - पुढील महिन्यात कोळसापुरवठ्याच्या स्थितीत सुधारणा होईल, अशी माहिती एमएससीबी होल्डिंग कंपनीचे संचालक आणि भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी गुरुवारी (ता. 12) दिली. 

मुंबई - पुढील महिन्यात कोळसापुरवठ्याच्या स्थितीत सुधारणा होईल, अशी माहिती एमएससीबी होल्डिंग कंपनीचे संचालक आणि भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांनी गुरुवारी (ता. 12) दिली. 

गेल्या काही दिवसांत पावसामुळे उकाडा कमी झाल्याने वीज मागणी कमी होत आहे. परिणामी भारनियमनही कमी झाले आहे. आजची विजेची मागणी 14 हजार 100 मेगावॉट होती; तर विजेची उपलब्धताही तितकीच होती. महावितरणने आपत्कालीन स्थितीसाठी 1450 मेगावॉट विजेची खरेदी खुल्या बाजारातून केली आहे. महानिर्मितीला कोळसा पुरवठादार कंपन्यांकडून एरवी 35 रेल्वे रेक्‍स कोळसा मिळतो; पण यंदा रेक्‍सची संख्या 20 हून कमी झाली. कोळसा खाणीच्या भागात अतिवृष्टी झाल्याने कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. महानिर्मितीला 23 लाख मेट्रिक टन कोळशाची गरज असते; पण कोळसा टंचाईमुळे कोळशाचा पुरवठा दीड लाख मेट्रिक टन एवढा खाली आला आहे. महानिर्मितीसह देशभरातील अन्य वीज कंपन्यांचीही कोळसा टंचाईमुळे अडचण झाली होती; पण नोव्हेंबर ते डिसेंबरसाठी कोळशाचा अतिरिक्त साठा करणार आहोत. त्यामुळे भारनियमनासारखी स्थिती पुन्हा उद्‌भवणार नाही, असेही पाठक यांनी सांगितले. 

नवीन फ्रॅंचाईसी 
जळगाव, लातूर, औरंगाबाद, धुळे, मुंब्रा या ठिकाणी पुन्हा एकदा फ्रॅंचाईसी सुरू होण्याचे संकेत पाठक यांनी दिले. धुळे, लातूर आणि मुंब्रा या ठिकाणी फ्रॅंचाईसी सुरू होणार आहे. याआधी जळगाव, औरंगाबाद येथे फ्रॅंचाईसी मॉडेल राबवण्यात आले होते; पण वसुलीत अपयश आले.