'दलित-मराठा संवाद पुन्हा सुरू होणार'

'दलित-मराठा संवाद पुन्हा सुरू होणार'

प्रश्‍न : बंद यशस्वी झाल्याचा दावा तुम्ही करताय. तुम्ही केवळ आजच्या दिवसभरातल्या बंद विषयी बोलताय की त्याकडे तुम्ही अधिक व्यापक दृष्टीने पाहताय. 
एका दिवसाच्या बंदविषयी बोलायचे तर तो यशस्वीच झाला. राज्यातली ५० टक्‍के जनता या बंदमध्ये सहभागी झाली होती. परंतु, कोरेगावच्या भीमाच्या हिंसेनंतर हे प्रकरण दलित विरुद्ध मराठा असल्याचे चित्र जाणीवपूर्वक निर्माण केले जात होते, हे षङयंत्र मात्र यशस्वी झाले नाही. मात्र, सर्वच संघटनांनी याप्रकरणी अत्यंत प्रगल्भता दाखविली. हा हल्ला केवळ दलितांवरचाच नाही तर बहुजनांवर झालेले आक्रमण असल्याचे वेळेत लक्षात आल्याने सर्वच संघटना आमच्यासोबत उभ्या राहिल्या. आमच्यात फूट पडली असती तर हा बंद यशस्वी झाला नसता. 

तुम्ही या बंदचे नेतृत्व केलेत, मात्र प्रत्येकवेळी तुम्ही मराठा समाजाच्या सर्व संघटनांना याचे श्रेय दिलेत...  ! 
उत्तर : गेले दीड वर्षे राज्यात मराठा क्रांती मोर्चा सुरू झाल्यानंतर मराठा आणि दलित समाजात कटुता आली होती, हे मान्यच करावे लागेल. ही कटुता कमी व्हावी, यासाठी मी वेळोवेळी प्रयत्न केले, मात्र त्यात यश मिळाले नाही. कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या २०० व्या दिना निमित्ताने हा संवाद आम्ही पुन्हा सुरू केला. संभाजी महाराज आणि गोविंद गायकवाडांच्या दुव्याने दलित - मराठा जवळ आले. दलित आणि मराठा संघटनांमध्ये पूर्णपणे खुंटलेला संवाद पुन्हा सुरू होणे हे चांगले चिन्ह आहे.  

आजच्या बंदमध्ये दलित संघटना एकत्रित येऊन रस्त्यावर उतरल्या. हा उद्रेक नेमका कशाच्या विरोधात होता?
उत्तर : राज्यभरातील बंदमध्ये केवळ दलित समुदाय रस्त्यावर उतरला होता हा गैरसमज आहे. दलितांबरोबरच मराठा आणि इतर बहुजन समाजाचे लोकंही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याने हा संप यशस्वी झाला. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील आलुतेदारांची संख्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. हे आलुतेदार गावकीची कामं करत. हे आलुतेदार या बंद मध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्यांच्या उद्रेकाची, त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची दखल घ्यावी अशी त्यांची मागणी होती.

कोरेगाव भीमा हिंसेला जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला. 
उत्तर : जो तरुण या प्रकरणात मारला गेला तो कोणत्या जातीचा होता? याचे उत्तर आम्हाला नकोच आहे. तो कुणाचा तरी मुलगा, मित्र होता तो का मारला गेला याचे उत्तर आम्हाला हवे आहे. गेले आठवडाभर सणसवाडीमध्ये तणाव होता तर, पोलिसांनी काय कारवाई केली? कोरेगाव भीमावरून परतणाऱ्या गाड्यांवर का आणि कोणी दगडफेक केली? मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी गावांमधील तरुणांना कसे भडकवले, खोटा इतिहास कसा पसरवला? याचा शोध घेतला तर या हिंसेला जातीय स्वरूप देण्याचा कोण प्रयत्न करतंय ते स्पष्ट होईल. दलित विरुद्ध मराठा असे चित्र जाणीवपूर्वक तयार करण्याचा प्रयत्न झाला, पण यांची राजकीय खेळी सर्वच पक्ष आणि संघटनांच्या लक्षात आल्याने परिस्थिती संयमितपणे हाताळली गेली.

या घटनेचा कोणाला राजकीय फायदा होईल?
या प्रकरणाचा कोणत्याच पक्षाला राजकीय फायदा होणार नाही. मात्र राजकीय फायदा व्हावा यासाठी भाजपने प्रयत्न केला, पण त्यांनाही त्याचा फायदा होणार नाही. भिडे आणि एकबोटे यांना अटक झाली नाही, तर त्यांना मोठा राजकीय फटका बसण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com