‘वजनदारां’वर नवा अभ्यासक्रम

मृणालिनी नानिवडेकर 
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

मुंबई - आधुनिक जीवनशैलीमुळे समोर आलेला स्थूलतेचा आजार हा महाराष्ट्राच्या आरोग्य शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतला आहे. लठ्ठपणात महाराष्ट्राने केलेली ‘प्रगती’ लक्षात घेऊन हा आजार कमी होण्याच्या दृष्टीने नवा अभ्यासक्रम आखला आहे. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने एमबीबीएस पदव्युत्तर अभ्यासक्रमात स्थूलता हाताळण्याचा नवा विषय मान्य केला आहे. ‘डीएनबी’ समकक्ष अभ्यासक्रम तयार करून जीवनशैली हाताळण्याची समस्या हाती घेणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य ठरणार आहे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या पाहणीत महाराष्ट्रात ‘वजनदार’ व्यक्‍तींचे प्रमाण चिंताजनक प्रमाणात वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच भारतातील ६२ टक्‍के मृत्यूंचे कारण मधुमेह, उच्चरक्‍तदाब, तसेच हृदयरोग असल्याचा प्रारंभिक निष्कर्षही वैद्यकीय संशोधनातून समोर आला आहे. महाराष्ट्राच्या शहरी भागातील लठ्ठ महिलांचे प्रमाण ३२.४ टक्‍के, तर पुरुषांचे प्रमाण ३१.२ टक्‍के आढळून आले आहे. वाढते वजन, मधुमेह, रक्‍तदाबपाठोपाठ फॅटी लिव्हर, हृदयरोगाचे धक्‍के असे आजार घेऊन येते. त्यात जीवन संपण्याची किंवा कुटुंबातील व्यक्‍तीच्या गंभीर रोगामुळे तणाव वाढण्याची शक्‍यताही व्यक्‍त करण्यात येते. स्थूलतेच्या आजाराचे सावट केवळ शहरी भागावर पडले नसून, ग्रामीण भागातही वजनदारांचे प्रमाण ११ ते १२ टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे. 

आरोग्य शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने महाराष्ट्राच्या विविध भागात आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात अतिलठ्ठपणासाठी दिवसभर रुग्णांनी नोंदणी केल्याची माहिती पुढे आली. आरोग्यदूत रामेश्‍वर यांनी सर्वत्र असे रुग्ण आढळून आल्याचे सांगितले. या सर्व शिबिरांमध्ये विनामोबदला उपस्थित राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या बॅरिॲट्रिक सर्जन आणि स्थूलतातज्ज्ञ डॉ. जयश्री तोडकर यांनी वजनाची वाढती समस्या हाताळण्यासाठी विशेष अभ्यासक्रमाची गरज असल्याचा सल्ला दिला. आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी या सूचनेचा स्वीकार करत हा अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी दाखवली आहे. एमबीबीएस किंवा आयुर्वेद अथवा होमिओपॅथीची समकक्ष पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता एक वर्षाच्या या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे.