डॉ. आंबेडकर स्मारकाच्या खर्चात 166 कोटींची वाढ 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

कोणतीही पूर्वतयारी न करता फक्त निवडणूक लक्षात घेता भूमिपूजन झाल्याने आजही स्मारकाचे काम प्रत्यक्षात सुरूच झाले नाही. त्यामुळे सरकारच्या या अनियोजनाचा आर्थिक फटका 166 कोटींचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलमधील स्मारक आर्थिक टंचाईत अडकणार नाही, याची काळजी सरकारने घ्यायला हवी. 
- अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ते 

मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मात्र, 23 महिन्यांत कामच सुरू झाले नसल्याने या स्मारकाच्या खर्चात 166 कोटींची वाढ झाली आहे. 

माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, इंदू मिल स्मारकासाठी 591 कोटी रुपये इतका अंदाजित खर्च येणार असून, मेसर्स शशी प्रभू अँड असोसिएट्‌स यांना आतापर्यंत 3.44 कोटी दिल्याची माहिती "एमएमआरडीए' प्रशासनाने "आरटीआय' कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे. 

मोदी यांनी भूमिपूजन केले त्या वेळी राज्य शासनाने 425 कोटी खर्च येणार असल्याची माहिती दिली होती. सध्या स्मारकाच्या बांधकामासाठी 14 एप्रिल 2017 रोजी "रचना व बांधणे' या तत्त्वावर निविदा मागविण्यात आल्या आहेत. निविदेसंबंधी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्मारकाचे काम सुरू होईल. यासाठी सुमारे 591 कोटी रुपये इतका अंदाजित खर्च येणार असल्याचे "एमएमआरडीए'ने स्पष्ट केले आहे. 

Web Title: maharashtra news Dr. Ambedkar Memorial