पदवी, पदविकेच्या जागा भरण्याचे आव्हान 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

राज्यातील लोकसंख्या आणि त्या आधारावरच किती पदवी, पदव्युत्तर आणि तंत्रशिक्षण महाविद्यालयांची गरज आहे, हे संबंधित विद्यापीठे ठरवतात. त्यानुसार नवी महाविद्यालये, तंत्रशिक्षण संस्थांना मंजुरी देणे आवश्‍यक असते; परंतु त्याकडे दुर्लक्षच केले जात असल्याने पारंपरिक आणि तंत्रशिक्षणाच्या हजारो जागा रिक्त राहत आहेत, हे अशोभनीय आहे. त्यातही गुणवत्तेचा प्रश्‍न गंभीर असून, यावर नव्याने विचार करण्याची गरज आहे. 
- रामनाथ मोते, माजी आमदार व शिक्षणतज्ज्ञ 

मुंबई - दोन आठवड्यांपूर्वीच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालानंतर राज्यभरातील विविध शाखांच्या पदवी, पदविका प्रवेशाच्या प्रवेश प्रकियेला वेग आला आहे; मात्र गतवर्षातील विविध शाखांच्या प्रवेशाची आणि रिकाम्या राहिलेल्या जागांची संख्या लक्षात घेता यंदाही कला, वाणिज्य, विज्ञान आदी पदवीसह अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्रच्या सुमारे सात लाख जागा रिक्त राहण्याची शक्‍यता आहे. 

राज्यात गतवर्षी सरकारी अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांत कला, वाणिज्य, विज्ञान आदींच्या 11,57,188 जागा, तर अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन, औषध निर्माणशास्त्र आदी शाखांसह तंत्रज्ञानाच्या विविध अभ्यासक्रमासाठींच्या 6,20,678 अशा एकूण 17,77,866 जागा होत्या; मात्र यापैकी पारंपरिकच्या 2,88,073, तर तंत्र शिक्षणाच्या 4,69,115 अशा एकूण 6,90,835 जागा रिकाम्या राहिल्या होत्या. गतवर्षी बारावीत 14,85,464 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे हे गणित बिघडले होते, असे शिक्षण विभागातील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे; मात्र यंदा कला, वाणिज्य शाखांसह तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना मोठ्या प्रमाणात मंजुरी मिळाल्याने सुमारे दोन लाखांहून अधिक जागांची भर पडली आहे. बारावीत यंदा 15,6,485 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे यंदाही पारंपरिक आणि तंत्रशिक्षणाच्या सुमारे सात लाख जागा रिक्त राहण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

यंदा जागा वाढल्या 
राज्यात सरकारी, अनुदानित, विनाअनुदानितच्या पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण देणाऱ्या 6,419 संस्था आहेत. त्यात यंदा 56 हून अधिक संस्थांची भर पडली आहे. तंत्रशिक्षण देणाऱ्या आयटीआयसह 3,070 संस्था आहेत. यातही 50 हून अधिक संस्था वाढल्याने जागांची संख्या वाढली आहे.