कर्जमुक्ती झाली हे सिद्ध करा!  - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्तीवरून राज्य सरकारवर पुन्हा शरसंधान केले आहे. राज्यात कर्जमुक्तीची वातावरणनिर्मिती सुरू आहे; प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. त्यामुळे कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची नावे पत्त्यानिशी द्यावीत, असे थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. जनतेची ताकद मोठी आहे. त्यांनी अहंकाराने वागू नये, असा सल्ला वजा इशाराही ठाकरे यांनी दिला. 

शिवसेनेतर्फे शुक्रवारी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद झाली. त्या वेळी ते बोलत होते. राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार आणि 89 लाख शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. मात्र कर्जमुक्ती मिळालेले शेतकरी लोकसंख्येपेक्षा जास्त होणार नाही, याची खबरदारीही घेणे आवश्‍यक असल्याचा चिमटाही उद्धव ठाकरे यांनी काढला. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, कर्जमाफीचा फायदा मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी विधानसभेत जाहीर करावी. घराघरांत जाऊन आम्ही ही यादी तपासू. कर्जमुक्तीचे अर्ज भरण्याचे 26 हजार पैकी 13 हजार केंद्रे बंद आहेत. मग दहा लाख शेतकरी पात्र ठरल्याची आकडेवारी कुठून आली, असा प्रश्‍न करून त्यांनी मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. 

"भाकितांवर बोलत नाही' 
कॉंग्रेसचे नेते नारायण राणे भाजपमध्ये जाणार आहेत. त्याबाबत आपली काय भूमिका असेल, असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला. त्यावर "मी भाकितांवर बोलत नाही. तसे घडल्यावर बोलू. उद्या मराठवाड्यात पाऊस पडणार आहे, असाही अंदाज आहे,' अशा शब्दांत त्यांनी राणे यांच्याविषयी विचारलेला प्रश्‍न टोलविला. 

Web Title: maharashtra news farmer loan uddhav thackeray