सरसकट कर्जमाफी निकषासह मंजुरी - चंद्रकांत पाटील

ब्रह्मा चट्टे
रविवार, 11 जून 2017

आंदोलन काळातील सर्व केसेस ( मुद्दे माल सापडलेल्या सोडून ) सरकार मागे घेणार आहे. दुध दर वाढ घोषीत केली जाईल असेही पाटील यांनी सांगितले. 

मुंबई : सरकारने सरसकट कर्जमाफी निकषासहीत मंजुरी दिली आहे. अल्पभुधारकांची व मध्यभुधारकांना कर्जमाफी आजपासून झाली असून लगेच त्यांना नविन कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीबरोबर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक सह्याद्रीवर आज झाली. त्यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी मंत्रीगटातील राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह शेतकरी नेत्यांमध्ये रघूनाथ पाटील, खा. राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, माजी न्यायमुर्ती बी. जी कोळसे पाटील, डाँ. अजित नवले, आमदार जयंत पाटील यांच्यासह सुकाणू समितीेचे सदस्य उपस्थित होते. 

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, " सरकारने शेतकर्‍यांच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा करत शेतकर्‍यांच्या बर्‍याच मागण्या मान्य करण्याची तयारी दर्शविली आहे. सरकारने सरसकट कर्जमाफी निकषासहीत मंजुरी दिली आहे. आंदोलन काळातील सर्व केसेस ( मुद्दे माल सापडलेल्या सोडून ) सरकार मागे घेणार आहे. दुध दर वाढ घोषीत केली जाईल असेही पाटील यांनी सांगितले. 

यावेळी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, "राज्यातील सर्व शेतकरी संघटना ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत असतात त्यांच्याबरोबर चर्चा मोकळ्यापणे झाली. राज्यातील दीड कोटी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज शेतकरी नेत्यांबरोबर बैठक घेण्यात आली. येत्या हंगामातील शेतीमाल खरेदी धोरण या हंगामापुर्वी ठरवला जाईल असे सांगत फुंडकर यांनी शेतकरी नेत्यांचे धन्यवाद मानले.
खासदार राजू शेट्टी म्हणाले, "शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होती. त्यामुळे शेतकरी नेते उपक्षीत राहतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण होते. सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे ही आमची अग्रही मागणी होती. आज पासून अल्पभूधारकांचे कर्जमाफ झाली आहे. त्यांना नव्याने कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आम्ही आग्रही होतो. आधिवेशनाच्या अगोदर संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे' असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी बोलताना दिला.

शेट्टी पुढे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळ पंतप्रधानाना भेटून  स्वामीनाथन समितीच्या शिफारसी मान्य करण्याची मागणी करण्यात येणार आहे. मंत्री गटाने चांगली भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांचे व मंत्रीगटाचे व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभारही राजू शेट्टी यांनी मानले. शेतकरी नेते रघूनाथ पाटील म्हणाले, " 13 जुलैचे धरणे आंदोलन व रेल रोको स्थगित केले आहे. समितीच्या निर्णयानुसार सरसकट कर्जमुक्ती करण्याला निकषासह मंजूरी मिळाली आहे. अत्यंत दिलाशादायक निर्णय घेतला आहे. आत्तापासून कर्जमाफी मिळाली असून हे शेतकरी लढ्याचे यश आहे. 
स्वामिनाथन समितीच्या शिफारसीसाठी आम्ही नेहमीच अग्रही असून त्याबाबतच लढा कायम ठेवणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

किसान सभेचे नेते डाँ. अजित नवले म्हणाले, शेतकऱ्यांनी प्रंचड एकजुटीने लढा उभा राहिला. पुणतांबे गावचे व त्यांच्या आवाहानाला साथ देणाऱ्या शेतकऱ्यांचे मी अभिनंदन करतो. सर्व शेतकरी नेते एकत्र आले हे अभुतपुर्व घटना आहे. आम्ही लोकशाही मार्गाने यशस्वी झालो आहोत. हे नव्या पिढीचे आंदोलन आहे. सर्व मार्गदर्शकांचे मानत आभार शाहू महाराजांच्या जयंतीदिन 26 जुलै पर्यंत सरकारने बाकीच्या मागण्यांबाबत आपले अश्वासन पुर्ण करावे असा इशाराही नवले यांना दिली.