गणेश मंडळांनी बुजवले रस्त्यांवरील दहा हजार खड्डे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

""राज्यातील सर्व गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. बुजलेल्या खड्ड्यांतून अनेकांचे जीव वाचू शकतील. मंडळांनी गोळा केलेल्या रकमेतून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व गरीब रुग्णांना उपचारासाठी चांगली मदत मिळणार आहे. यातून सामाजिक बांधिलकी वाढेल व नवीन प्रबोधन सुरू होईल'' 
- शिवकुमार डिगे, धर्मदाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य 

पुणे - राज्याचे धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी घोषित केलेल्या "खड्डे बुजवा, जीव वाचवा' उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत राज्यातील गणेश मंडळांनी रस्त्यांवरील सुमारे दहा हजार खड्डे बुजविले आहेत. तसेच मंडळांनी गोळा केलेल्या वर्गणीतून सात कोटी 56 लाख रुपये गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व रुग्णांच्या उपचारासाठी येत्या वर्षभरात खर्च करण्याचे ठरवून सर्व गणेश मंडळांनी सामाजिक कार्याला हातभार लावला आहे. 

राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्‍न विचारात घेऊन धर्मदाय आयुक्त डिगे यांनी "खड्डे बुजवा, जीव वाचवा' असा उपक्रम राबविण्याचे आणि सर्व गणेश मंडळांनी आपल्या वर्गणीतील 10 टक्के रक्कम सामाजिक कार्यासाठी खर्च करावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला मुंबईच्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्यासह राज्यातील अनेक गणेश मंडळांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या अभियानांतर्गत रांजणगाव गणपती देवस्थाननेही आपल्या परिसरातील सुमारे 20 किलोमीटर रस्त्यावरील खड्डे नुकतेच बुजविले. त्यासाठी धर्मदाय विभागातर्फे देवस्थानचा विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचे धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

Web Title: maharashtra news ganesh mandal potholes Shivkumar Dighe