"जीएसटी' एसटीला लाभदायक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

मुंबई - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) एसटी महामंडळाला लाभदायक ठरणार आहे. "जीएसटी' लागू होत असल्याने शिवनेरी आणि शिवशाही बसचे भाडे उद्यापासून (ता. 1) पाच ते सात रुपयांनी कमी होणार आहे. 

मुंबई - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) एसटी महामंडळाला लाभदायक ठरणार आहे. "जीएसटी' लागू होत असल्याने शिवनेरी आणि शिवशाही बसचे भाडे उद्यापासून (ता. 1) पाच ते सात रुपयांनी कमी होणार आहे. 

एसटीच्या एसी बसभाड्यावर प्रति शंभर रुपयांवर सहा टक्के सेवाकर होता. "जीएसटी' लागू होत असल्याने तो पाच टक्‍के होणार आहे, त्यामुळे एसटीच्या शिवनेरी आणि शिवशाही वातानूकुलित बसचे भाडे पाच ते सात रुपयांनी कमी होईल, अशी माहिती एसटी महामंडळातर्फे देण्यात आली. एसटी सेवा जीवनावश्‍यक आणि दैनंदिन सेवेत मोडते. "जीएसटी'तील प्रस्तावानुसार अशा सेवांवर पाच टक्‍के कर लागू होतो, त्यामुळे एसटीच्या एसी बस प्रवाशांना "जीएसटी' लाभदायक ठरणार आहे. सध्या एसटीच्या ताफ्यात 125 एसी शिवनेरी आणि दोन एसी शिवशाही बस आहेत. मुंबई- पुणे, ठाणे- पुणे, पुणे- औरंगाबाद, पुणे- नाशिक या मार्गांवर शिवनेरी; तर शिवशाही बस मुंबई- रत्नागिरी आणि पुणे- लातूर मार्गावर धावतात. 

शिवनेरीची भाडेघट 
- मुंबई, ठाणे ते पुणे भाडे पाच रुपयांनी कमी 
- पुणे ते औरंगाबाद भाडे सहा रुपयांनी कमी 
- पुणे ते नाशिक भाडे सात रुपयांनी कमी 

शिवशाहीची भाडेघट 
- मुंबई ते रत्नागिरी आणि पुणे ते लातूर भाडे पाच रुपयांनी कमी 

खासगी बससेवांमध्ये संभ्रम 
खासगी एसी बससेवा देणाऱ्या कंपन्यांच्या मालकांमध्ये अजूनही "जीएसटी'बाबत संभ्रम आहे. एसी बसमध्ये काही आलिशान बस आहेत, त्यामुळे नेमक्‍या कोणत्या प्रकारातील एसी बसवर किती टक्‍के "जीएसटी' असेल हे सांगणे कठीण असल्याचे मुंबई बसमालक संघटनेचे अतिरिक्‍त सचिव के. व्ही. शेट्टी यांनी सांगितले. कर पाच टक्‍के असेल की 15 टक्‍के, यावर चर्चा होणार असून, सोमवारी खासगी बसमालक संघटनांची मुंबईत एक बैठक होईल, अशी माहिती त्यांनी दिली. 

रेल्वेच्या फर्स्ट क्‍लासला फटका 
रेल्वेच्या एसी आणि मुंबई उपनगरी लोकलच्या पहिल्या वर्गाच्या भाड्यावरही "जीएसटी'चा परिणाम होईल. सध्या या सेवेवर 4.5 टक्‍के सेवा कर घेतला जातो. "जीएसटी'मुळे हा कर पाच टक्‍के होईल. त्यामुळे या एसी आणि लोकलच्या पहिल्या वर्गाच्या भाड्यात किरकोळ वाढ होईल.