कासवर हजारो पर्यटकांची मांदियाळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

कास - वैशिष्ट्यपूर्ण निसर्गसंपदेचा खजिना असलेल्या कास पुष्प पठारावर विविधरंगी फुलांचा गालिचा फुलायला सुरवात झाल्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर कास पठारावरील या नयनरम्य दृष्यांचा अविष्कार पाहण्यात गुंग होत आहेत. 

कास - वैशिष्ट्यपूर्ण निसर्गसंपदेचा खजिना असलेल्या कास पुष्प पठारावर विविधरंगी फुलांचा गालिचा फुलायला सुरवात झाल्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर कास पठारावरील या नयनरम्य दृष्यांचा अविष्कार पाहण्यात गुंग होत आहेत. 

कास पठारावर एक सप्टेंबरपासून अधिकृतरित्या हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. पठारावर प्रवेश शुल्क म्हणून शंभर रुपये आकारण्यात येत आहेत. ऊन-पावसाच्या खेळामुळे पठारावरील जीवसृष्टी चांगलीच बहरून गेली आहे. पठारावर तेरड्याच्या ताटव्याने लालगुलाबी रंगाच्या छटा पाहावयास मिळत आहेत, तर पांढरे चेंडूच्या आकाराचे गेंद फुले व निळी सीतेची आसवे या दोघांच्या मिश्रणातून पठार काही ठिकाणी निळेपांढरे दिसत आहे. 

पिवळी मिकी माउस व सोनकीनेही पिवळ्या रंगाचा सोनेरी साज पाहायला मिळत आहे. 

विदेशी पर्यटकांचीही गर्दी कासवर दिसू लागलेली आहे. सलग सुट्यांमुळे हजारो पर्यटकांनी कासला गर्दी केली होती. कार्यकारी समितीच्या अध्यक्ष विमल शिंगरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आखाडे, सोमनाथ जाधव, मारुती चिकणे आदींसह शेकडो स्वयंसेवक, गाइड पर्यटकांच्या सोयी-सुविधांसाठी मेहनत घेताना दिसत आहेत. पार्किंगपासून बसची सुविधा सुरू केल्यामुळे पठारावर वाहनांची गर्दी कमी होवून वाहतूक सुरळीत राहत आहे. 

वन विभागाच्या वतीने मेढ्याचे वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे, बामणोलीचे वनपाल श्रीरंग शिंदे, कासचे वनरक्षक संतोष शिंदे, पठारावरील व्यवस्थापन यंत्रणेवर बारकाईने लक्ष ठेवून कासचा हंगाम यशस्वितेसाठी प्रयत्न करत आहेत. 

दरम्यान, सुटीमुळे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सहकुटुंब कास पठाराला भेट देवून येथील फुलांची माहिती घेतली. त्यांच्यासोबत जावळीच्या तहसीलदार रोहिणी आखाडे याही उपस्थित होत्या. 

कास पठार हे ठिकाण अद्वितीय असून, येथील पुष्प वैभव पाहून अचंबित झाले. अमेझिंग असे ठिकाण. मनापासून आवडले.  
-ॲनी,  जर्मन पर्यटक

Web Title: maharashtra news Kas pathar tourist

टॅग्स