कॉर्पोरेट क्षेत्राच्या मदतीने सर्वांगीण विकास - मुख्यमंत्री

कॉर्पोरेट क्षेत्राच्या मदतीने सर्वांगीण विकास - मुख्यमंत्री

मुंबई - कॉर्पोरेट क्षेत्राच्या सहभागातून विविध सामाजिक क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी कॉर्पोरेट कंपन्यांबरोबर ३४ सामंजस्य करार करण्यात आले. राज्य सरकार आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या एकत्रित सहभागातून राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हे सामंजस्य करार अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस या वेळी म्हणाले. 

टाटा ट्रस्ट, टाटा पॉवर, टाटा केमिकल, टाटा सेंटर ऑफ डेव्हलपमेंट, शिकागो विद्यापीठ, इग्ना फाऊंडेशन, आदित्य बिर्ला फाऊंडेशन, एटीई फाऊंडेशन, आर. झुनझुनवाला फाऊंडेशन, आर. के. दमाणी, इनाम होल्डिंग्ज, वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट, बिलियन लाईव्हज, सेंटर फॉर डिजिटल फायनान्शिअल इन्क्‍लुजन या कॉर्पोरेट संस्था आणि राज्य सरकारचे विविध विभाग यांच्यात ३४ सामंजस्य करार करण्यात आले. आरोग्य, पोषण, वन्यजीव संवर्धन, पशुसंवर्धन, कौशल्य विकास, आदिवासी मुलांचे शिक्षण, जलसंधारण, तलावांचे संवर्धन, ग्रामविकास आदी क्षेत्रांत काम करण्याबाबत हे सामंजस्य करार आहेत.

सामाजिक क्षेत्रांचा समावेश 
नागपूर येथे रीजनल मेंटल हॉस्पिटलचा विकास करणे आणि मॉडेल मेंटल हेल्थ कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, चंद्रपूर जिल्ह्यात एल्डरली केअर कार्यक्रम राबवणे, नागपूर महापालिका क्षेत्रात आरोग्यविषयक कार्यक्रम राबवणे, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांतील माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन करणे, अकोला, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांत जलयुक्त शिवार अभियान राबवणे, नाशिक जिल्ह्यातील धरणे आणि तलावांतील गाळ काढणे, सोलापूर जिल्ह्यातील कासळगंगा नदीचे पुनरुज्जीवन, गडचिरोली, नाशिक, नंदूरबार आणि पालघर जिल्ह्यांतील आदिवासी आश्रमशाळांचा विकास, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात कर्करोग केअर सिस्टीम सुरू करणे, गोरेगाव आणि परळ येथे पशुवैद्यकीय केंद्र सुरू करणे आदींबाबत टाटा ट्रस्टबरोबर सरकारच्या विविध विभागांचे सामंजस्य करार करण्यात आले.

अमरावती जिल्ह्यात पोषण कार्यक्रम राबवण्याबाबत टाटा केमिकलबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. मागासवर्गीय आणि आदिवासी युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे, पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील आयटीआयमधील तांत्रिक प्रशिक्षणात सुधारणा, जव्हार तालुक्‍यातील साकूर येथील आदिवासी मुलींच्या निवासी शाळेचा विकास, जव्हार तालुक्‍यातील आदिवासी गावांचा विकास आदींबाबत टाटा पॉवरसोबत संबंधित विभागांनी सामंजस्य करार केले. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार मोहिमेबाबत टाटा सेंटर ऑफ डेव्हलपमेंट, शिकागो विद्यापीठ यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला. नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद विभागांतील पाण्याचे स्त्रोत गाळमुक्त करण्याबाबत विविध कंपन्यांबरोबर लेटर ऑफ इंटेन्टची देवाण-घेवाण करण्यात आली.

गावांच्या विकासासाठी विविध करार
राज्य सरकार आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या एकत्रित सहभागातून गावांचा कायापालट करण्याच्या उद्देशाने व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाऊंडेशन स्थापन करण्यात आले आहे. याअंतर्गत आदित्य बिर्ला फाऊंडेशनबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील गावांच्या विकास कार्यक्रमाबाबत सामंजस्य करार करण्यात आला. अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गावांच्या विकास कार्यक्रमाबाबत टाटा ट्रस्टबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. बीड जिल्ह्यातील गावांच्या विकास कार्यक्रमाबाबत एटीई फाऊंडेशन, आर. झुनझुनवाला फाऊंडेशन, डी-मार्ट, इनाम होल्डिंग्ज यांच्याबरोबर सामंजस्य करार करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील गावांच्या विकास कार्यक्रमाबाबत वाईल्ड लाईफ कॉन्झर्व्हेशन ट्रस्ट यांच्याबरोबर सामंजस्य करार झाला. व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन मिशनअंतर्गत बिलियन लाईव्हज आणि सेंटर फॉर डिजिटल फायनान्शिअल इन्क्‍लुजन यांच्याबरोबरही सामंजस्य करार करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com