माळीण सरकारच्या भ्रष्टाचाराचे पारदर्शक उदाहरण - सचिन सावंत

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 जून 2017

मुंबई -  सरकारने पुनर्वसन केलेल्या माळीण गावाची पहिल्याच पावसात झालेली दुर्दशा हे राज्यातील फडणवीस सरकारच्या भ्रष्ट आणि निष्काळजी कारभाराचे पारदर्शक उदाहरण आहे, अशी टीका कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 

मुंबई -  सरकारने पुनर्वसन केलेल्या माळीण गावाची पहिल्याच पावसात झालेली दुर्दशा हे राज्यातील फडणवीस सरकारच्या भ्रष्ट आणि निष्काळजी कारभाराचे पारदर्शक उदाहरण आहे, अशी टीका कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 

पुनर्वसन केलेले माळीण गाव हे राज्यातील स्मार्ट ग्राम असून, पुनर्वसनाचे आदर्श मॉडेल आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 एप्रिलला झालेल्या माळीण येथील लोकार्पण कार्यक्रमात केला होता; पण पहिल्याच पावसात माळीण गावची झालेली दुर्दशा पाहता मुख्यमंत्र्यांचा दावा किती फोल होता हे स्पष्ट झाले आहे. भयानक दुर्घटनेत 151 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने कोट्यवधींचा खर्च करून माळीण गावाचे पुनर्वसन केले; मात्र अवघ्या दोनच महिन्यांत पहिल्याच पावसात पुनर्वसित माळीण गावची दुर्दशा झाली आहे. यामुळे माळीण गावातील लोकांना पुन्हा एकदा मृत्यूच्या सावटाखाली जीवन जगावे लागत आहे. काही ग्रामस्थ घर सोडूनही गेले असल्याचा आरोप त्यांनी केला. 

सरकारने जागेची निवड करून पुनर्वसन केलेल्या माळीण गावातील घरांच्या भिंती, पायऱ्या, ड्रेनेज पाइप्स, शाळा, मंदिर यांना तडे गेले आहेत. काही ठिकाणी रस्ते, भिंती, पायऱ्या खचल्या आहेत. रस्त्यांचे भराव वाहून गेले आहेत. त्यांच्यावर मोठे खड्डे पडले आहेत. शाळेवर भिंत कोसळण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात पुन्हा धास्ती असल्याचे सावंत म्हणाले. 

माळीण गावाच्या सद्यस्थितीला सरकार जबाबदार असून, दुर्दैवाने काही अपघात घडला आणि जीवितहानी झाली तर याची पूर्ण जबाबदारी सरकारची असेल, असे सावंत म्हणाले.