रमेश कदम यांना अन्य तुरुंगात हलवा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

मुंबई -  भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेले आमदार रमेश कदम अन्य कैद्यांना चिथावणी देतात. त्यांच्यामुळे तुरुंग प्रशासनास धोका पोचू शकतो. त्यामुळे त्यांना ठाणे किंवा तळोजा तुरुंगात हलवण्यात यावे, अशी मागणी राज्य सरकारच्या वतीने विशेष न्यायालयात केल्याची माहिती भायखळा तुरुंग अधीक्षकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयाला दिली. 

"जन अदालत' या सामाजिक संस्थेने ऍड. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्या. अभय ओक आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. जिल्हा न्यायाधीशांनी राज्यातील विविध तुरुंगांची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने यापूर्वी दिले होते. त्यानुसार सत्र न्यायालयातील न्यायाधीशांनी भायखळा तुरुंगाची पाहणी केली होती. या भेटीदरम्यान कदम यांनी न्यायाधीशांसोबतही गैरवर्तन केले. त्यामुळे ही मागणी केल्याचे या प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केले आहे. 

कारागृह अधीक्षकांच्या या प्रतिज्ञापत्रातील माहितीबाबत आश्‍चर्य व्यक्त करत विशेष न्यायालयात होणाऱ्या पुढील सुनावणीदरम्यान हे प्रतिज्ञापत्रही दाखल करावे, असे निर्देश न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला दिले. तुरुंगात असतानाही कदम यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तुरुंगातील काही कैद्यांसोबत समूहाने राहून ते तुरुंग प्रशासनाविरोधात चिथावणी देतात. त्यांच्याविरोधात गैरवर्तणुकीच्या अनेक तक्रारीही आहेत, त्यामुळे त्यांना अन्य कारागृहात पाठवावे, असे तुरुंग प्रशासनाचे म्हणणे आहे. यावर विशेष न्यायालयात गुरुवारी (ता. 21) सुनावणी होणार आहे. 

दरम्यान, भायखळा तुरुंगातील महिला कैदी मंजुळा शेट्येच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्या तुरुंगातील अनेक गैरप्रकारांबाबत कदम यांनी नुकतेच राज्य सरकारला निवेदन दिले आहे.