ओझोन थराच्या संरक्षणाचे हवे सामाजिक भान

ओझोन थराच्या संरक्षणाचे हवे सामाजिक भान

काय आहे ओझोन?
ओझोन हा रंगहीन वायू आहे. तो वातावरणात दोन थरांमध्ये आढळतो. पहिला थर जमिनीपासून १० ते १६ किलोमीटरपर्यंत तर, दुसरा १७ ते ५० किलोमीटरवर असतो. पहिल्या थराचे प्रमाण प्रदूषणामुळे वाढल्यास फुफ्फुसांची क्षमता खालवते. खोकला, सर्दी, डोळे चुरचुरणे, श्‍वास घेण्यास त्रास जाणवतो. पृथ्वीवरचे तापमान वाढते. जंगलाच्या वाढीवर परिणाम होतो. याउलट ओझोनचा दुसरा थर उपयुक्त असतो. पृथ्वीबाहेरील आवरणालगतच्या थरावर तो असतो. सूर्याची अतिनील किरणे (अल्ट्राव्हायोलेट) थोपवण्याचे काम तो करतो. त्यामुळे अतिनील किरणांपासून पृथ्वीचा बचाव होतो. 

काय आहे समस्या?
१९३० मध्ये अमेरिकेत क्‍लोरोफ्लोरो कार्बन (CFC) या वायूची निर्मिती करण्यात आली. वातानुकूलित यंत्रे, फ्रिज, फेस निर्माण करणारी रसायने, वायुस्वरूपातील कीटकनाशके, कॉम्प्युटर, फोन, इलेक्‍ट्रिक उपकरणाचे बोर्ड साफ करण्यासाठी याचा वापर सुरू झाला. मानवाला अपायकारक नसलेला हा वायू हवेतील अतिनील किरणांमुळे ओझोनच्या थरावर परिणाम करू लागला. या वायूतील क्‍लोरिन वेगळा होतो. तो क्रियाशील असल्याने त्याची ओझोनशी प्रक्रिया होऊन ओझोनचा थर नष्ट करण्याची प्रक्रिया करतो. ग्रीन हाउसमध्येही हा क्‍लोरोफ्लोरो कार्बन तयार होऊ लागल्याने ओझोनचा थर विरल होत त्याला छिद्र पडल्याचे शास्त्रज्ञांच्या १९९५ मध्ये निदर्शनास आले. त्याचबरोबर हेलॉन्स, कार्बन टेट्राक्‍लोराइड, मिथाइल क्‍लोरोफार्म या वायूमुळेही ओझोनचा थर नष्ट होत असल्याचे शास्त्रज्ञांना लक्षात आले. 

काय होतील दुष्परिणाम 
अतिनील किरणांमुळे त्वचेची रोगप्रतिकारक क्षमता घटून त्वचेचे कर्करोग होतील. वनस्पतीच्या पानांचे आकार लहान होतील. मका, तांदूळ, गहू, सोयाबीन, वाटाणा अशा पिकांचे उत्पादन कमी होऊन, कपड्याचे रंग, प्लॅस्टिकचे फर्निचर, पाइप खराब होतील. जमिनीवरचे तापमान वाढून त्सुमानीसारखी संकटे ओढवतील. हिमनद्या वितळून समुद्रालगतचे देश, शहरे पाण्यात बुडून जातील. शिवाय, जगाचा नाश होण्याची भीती तज्ज्ञाकडून व्यक्त होते. 

उपाययोजना 
ओझोनचा थर पूर्वपदावर आणण्यासाठी जगभरातील देश प्रयत्नशील आहेत. त्यासाठी १९८७ मध्ये माँट्रियल करार करण्यात आला. त्यानुसार क्‍लोरोफ्लोरो कार्बनचा (CFC)  वापर बंद करण्यात आला. त्याला पर्याय म्हणून हायड्रोक्‍लोरोफ्लुरोकार्बन (HCFL) आणि हायड्रोफ्लुरोकार्बन ( HFC) वापर सुरू झाला. या दोन्हींचाही ओझोनच्या थरावर परिणाम कमी असला, तरी २०३० पर्यंत ही नवी रसायने वापरणे बंद होणार आहे. 

पर्याय निर्मितीत यश
वातानुकूलित यंत्रे, फ्रिज, शीतगृह यांमध्ये क्‍लोरोफ्लोरो कार्बनच्या वापरात जागतिक स्तरावर बंदी असली, तरी तज्ज्ञांच्या मते काही देशांमध्ये याचा चोरी, छुपी होत असलेला वापर १०० टक्के बंद व्हायला हवा. त्यासाठी सामाजिक भान आवश्‍यक आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे उपाय ठरू शकते. ओझोनवर दुष्परिणाम करणाऱ्या वायूला पर्याय निर्माण करून देण्यात शास्त्रज्ञ यशस्वी होत आहेत. त्यांचा वापर काटोकरपणे करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य बनावे. ओझोन मित्र उत्पादने बाजारात मोठ्या प्रमाणावर आली आहेत. फक्त त्याचाच वापर केला पाहिजे. जागतिक करारामध्ये घातलेल्या अटींचे काटेकोरपणे पालन केल्यास २०५० पर्यंत ओझोनचा थर पूर्ववत होईल, असा विश्‍वास शास्त्रज्ञांनी अनेकदा व्यक्त केलाय.

क्‍लोरोफ्लोरो कार्बनमुळे ओझोन थरावर परिणाम होत असल्याने त्याचा वापर बंद झाला आहे. जगभर उपाययोजना सुरू आहेत. भारतात चार वायूंवर पूर्णपणे बंदी घातली आहे. 
- प्रा. डॉ. श्री. देशमुख,
माजी विभागप्रमुख, ॲग्रो केमिकल विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com