'भारतातही रोवले पॅलेडियम इंडियाने पाय'

'भारतातही रोवले पॅलेडियम इंडियाने पाय'

मुंबई - ‘उद्योगाच्या भरभराटीसाठी सक्षम, प्रगत समाजाची आवश्‍यकता असते. उद्योग आणि समाज हे परस्पराला पूरक असून, त्यांना एकमेकांपासून वेगळे करता येणार नाही. समाज प्रगत नसेल, तर उद्योगाचा विकास होऊ शकत नाही. या सूत्रावर पॅलेडियम इंडिया काम करणार आहे,’ असे प्रतिपादन पॅलेडियमचे संस्थापक डॉ. रॉबर्ट एस. कॅपलान यांनी आज केले. विविध देशांमध्ये समाजोपयोगी कामे करणाऱ्या पॅलेडियमचा आज भारतात प्रारंभ करण्यात आला.

यानिमित्ताने मुंबईत ‘डुईंग ग्रेट बाय डुईंग गुड’ या विषयावर चर्चासत्र झाले. त्यात विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले होते. डॉ. कॅपलान यांनी समाजातील अनेक समस्या या वेळी मांडल्या. भारतातील ग्रामीण महिलांमधील आरोग्य समस्या उपस्थित उद्योगसमूहांच्या प्रतिनिधींपुढे मांडली. पॅलेडियमच्या माध्यमातून या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘उद्योगसमूहाने समाजापासून स्वतःला वेगळे समजू नये. समाजालाही उद्योग विश्‍वाकडून अपेक्षा असतात. उद्योगांनी रोजगार उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून गरिबी दूर होईल. उद्योग आणि समाजात इकोसिस्टीम तयार करून जास्तीत जास्त लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचा आमचा उद्देश आहे. त्यासाठी नागरिकांमधील गुणवत्तेचा विकास करून कौशल्य क्षमता निर्माण करण्यात येईल. या सूत्रावर पॅलेडियम इंडिया काम करणार आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.

भारतात सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी ‘इंडिया पॉझिटीव्ह इप्मॅक्ट कम्युनिटी’चा प्रारंभ यावेळी करण्यात आला. भारतात सकारात्मक बदल कसा करता येईल यावरही एक चर्चासत्र झाले. डॉ. कॅपलान, मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव कौस्तुभ धवसे, अल्ट्रा टेक सिमेंटचे चीफ एक्‍झिक्‍युटिव्ह शशी मौदगल, एक्‍स्चेंज फॉर मीडियाचे संस्थापक नवल आहुजा, आशिष सेन कन्सल्टन्सी आणि कोचिंगचे आशिष सेन सहभागी झाले होते. या चर्चासत्राचे निवेदन पॅलेडियम इंडियाच्या सीईओ बार्बरा स्टॅन्कोविकोवा यांनी केले. सीएसआरच्या वापराबाबत झालेल्या चर्चासत्रात पॅलेडियमचे इम्पॅक्‍ट इनोव्हेशन डायरेक्‍टर पीटर वॅंड्रेवल, मर्क्‍स ऑफ मदर्सचे नवीन राव, फेथ हेल्थ केअरचे प्रदीप अगरवाल सहभागी झाले होते. या चर्चासत्राचे निवेदन फ्युचरस्केपच्या संचालिका नम्रता राणा यांनी केले. एनटीपीसीचे सहायक व्यवस्थापकीय संचालक मनोज दुबे, टाटा ग्लोबल सस्टेनेबिलिटी कौन्सिलचे संचालक मुकुंद राजन यांनी मार्गदर्शन केले. समारोप सेंटर फॉर सिव्हिल सोसायटीचे संचालक लुईस मिरांडा यांनी केला.

कंपनीची संस्कृतीही महत्त्वाची - शिवकुमार
समाजासाठी एखादी कंपनी काय करते यावर समाजात त्या कंपनीची पत ठरत असते. यातूनच कंपनी वाढते, असे पेप्सिकोचे चेअरमन, सीईओ डी. शिवकुमार यांनी नमूद केले. काही वर्षांपूर्वी एक सर्वेक्षण झाले होते. त्यात ८७ टक्के नागरिकांनी कंपनीने नफा कमवणे गैर नसल्याचे नमूद केले, पण त्याचबरोबर समाजाच्या विकासालाही प्राधान्य द्यावे, अशी भूमिका मांडली होती. यातून समाज आणि उद्योग वेगळे नसल्याचे स्पष्ट होते. नेतृत्व निर्माण करणाऱ्यांवर भर देण्याबरोबरच समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, असा विचारही असणे गरजेचे असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.

सीएसआरमधून बाहेर पडून समाजासाठी काम करा - अभिजीत पवार 
उद्योगांना सीएसआर निधीतून समाजासाठी काम करणे बंधनकारक आहे; मात्र या सीएसआरमधून बाहेर पडून समाजासाठी काम करायला हवे. या हेतूनेच ‘सिमॅसिस’ हा उपक्रम उभा राहिला. त्यातूनच आता सरकारच्या सहकार्याने जुन्नर येथे पहिले स्मार्ट व्हिलेज उभे राहणार आहे, अशी माहिती ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार यांनी या वेळी दिली. लोकांच्या हिताचा विचार करून त्यांच्या प्रगतीसाठी एखादा उपक्रम उभारायला हवा असा आमचा मानस आहे. त्याची सुरवात आम्ही केली. तनिष्काच्या माध्यमातून महिलांना व्यासपीठ मिळवून दिले. या महिला स्वत:साठी नाही, तर दुसऱ्याच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेतात. त्यांना राज्याचे मुख्यमंत्रीही भेटतात. विद्यार्थीदशेत असताना बिझनेस कसा करावा याची माहिती देणारे कोणीच नव्हते; मात्र ‘यिन’च्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. राज्यातील १५ लाख विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहचलो आहोत. वृत्तपत्र आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. याही माध्यमातून आम्ही समाजासाठी काम करतो. ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून फक्त शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या नाहीत तर त्यांच्या विकासासाठी काम केले. अशा कामातूनच स्मार्ट व्हिलेज उभारण्याची ऊर्मी मिळाली असेही त्यांनी नमूद केले. पॅलेडियमबद्दल अभिजीत पवार म्हणाले, ‘इतर सल्लागार कंपन्यांपेक्षा ही कंपनी वेगळी आहे. फक्त सल्ला देण्यापुरते हे मर्यादित न राहता त्याच्या अंमलबजावणीसाठीही सहकार्य केले जाते.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com