निसर्गाचे रूप न्याहाळायचंय चला कचरेवाडी, वाउंडला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

टाकवे बुद्रुक - नागमोडी वळणाची वाट...सह्याद्रीच्या कडेपठारावर नटलेली हिरवी गर्द वनराई... त्यावर दाटून आलेली धुक्‍याची दुलई...शिखरावरून फेसाळत वाहणारे धबधबे...शिवारात बळिराजाची साद... डोंगराच्या पायथ्याला कौलारू घरात वावरणारी रयत...हे निसर्गाचे रूप न्याहाळायला कचरेवाडी, वाउंडला आले पाहिजे. निसर्ग दोन्हीही हातांनी आपल्या रूपाची येथे उधळण करीत आहे. पर्यटकांच्या नजरेतून सुटलेले हे विलोभनीय रूप आज साद घालत आहे.

सह्याद्रीच्या डोंगर अंगाला कचरेवाडी, वाउंड ही गावे वसली आहेत. टाकवे बुद्रुकवरून डावीकडे वळून अवघे पाच किलोमीटर अंतर आल्यावर घोणशेतच्या डोंगरालगतच्या माळरानावर वनविभागाने लावलेली हिरवी गर्द झाडी आपले स्वागत करते. त्याच मार्गाने पुढे देशमुखवाडीवरून कचरेवाडी आणि पुढे वाउंडला जाता येते. तशी ही पिढ्यान्‌पिढ्या वसलेली गावे, डोंगर पायथ्याला त्यांचे वास्तव आहे. डोंगराच्या माचीवर गाय-वासरांची भूक भागते. 

दूध आणि शेती हा येथील मुख्य धंदा. वाउंडला येणारा दुसरा मार्ग कामशेतवरून येतो. तेथे इंद्रायणी नदी ओलांडून नाणेतून डावीकडे निघालो की नाणोली साईमार्गे वाउंडला येता येते. या मार्गाने नाणेच्या थोडे पुढे आले की सह्याद्रीच्या सोबतीने रस्ता कापत पुढे यायचे. डावीकडे वनराईने नटलेला हिरवागार डोंगर डोळ्यात साठवून निघायचे, उजवीकडे भात खाचरातील लावणीची लगबग न्याहाळत जायचे. या मार्गावर फक्त नाणोलीत चहा वडापावची सोय आहे. त्यामुळे सध्या तरी सोबतीला शिदोरी असलेली चांगले. दोन चार तासांची हिरवळीतील ही सफर मनाला उत्साह देणारी आहे. मात्र येथे दोन्हीही बाजूने येताना रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून वाहने चालविणे खडतर आहे. निसरडा रस्ता असल्याने वाहने जपून चालविली पाहिजेत.