नात्यापलीकडची राखी पौर्णिमा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

भाऊ-बहिणीचे नाते हे अनमोल आहे. या नात्याला कुठल्याही जात-धर्माची सीमा नाही. हे नाते टिकत असते केवळ विश्‍वासावर. मदतीच्या वेळेस धावून जाणे, हा या नात्याचा विशेष धर्म. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने अशाच काही बहीण- भावांच्या नातेसंबंधांवर टाकलेला प्रकाश...

जाती-धर्मापलीकडचे नाते 
नागपूर - शुभांगी आणि जावेद हे बहीण- भावाचे अनोखे नाते. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या मल्हार फाउंडेशनमध्ये या दोघांची ८ वर्षांपूर्वी भेट झाली. जाती आणि धर्माच्या भिंती नसलेल्या या संस्थेत जावेद आणि शुभांगीमधील भावा-बहिणीच्या नात्यांची विण घट्ट झाली. शुभांगी म्हणते, ‘‘आमच्या नात्यात जात कधीच आडवी आली नाही. जावेद मला सख्ख्या भावाप्रमाणे आहे. माझा अपघात झाला तेव्हा जावेदच सर्वांत आधी धावून आला. माझी मोठ्या भावाप्रमाणे काळजी घेतली.’’ 

जाती- धर्मांच्याही पलीकडे मानवतेचे नाते जपणाऱ्या नात्यांची आज समाजाला खूप गरज आहे, असे शुभांगी आणि जावेद म्हणतात. मेघना गोरे यांच्या निमित्ताने निर्माण झालेले हे सच्चे नाते आज अनेकांसाठी आदर्श ठरत आहे.

बहिणीने भावाला दिले नवे जीवनदान!
सोलापूर -
वयाच्या ४८ व्या वर्षी प्रभू रामू शिंपले यांना त्यांचे दोन्ही मूत्रपिंड (किडनी) खराब झाल्याचे समजले. त्यांच्या कुटुंबासाठी हा खूप मोठा आघात होता. शिंपले यांची मुले अजून शिकत होती. डायलिसिस करून फक्त दिवस ढकलणे हा पर्याय त्यांच्यापुढे होता. डायलिसिससाठी खर्चही जास्त होत होता. मात्र, त्रास कमी होत नव्हता. अशावेळी शिंपले यांच्या दोन्ही बहिणींनी (ठकूबाई काकडे व सुनंदा गायकवाड) भावाला मूत्रपिंड देण्यासाठी तयारी दर्शविली. ठकूबाई काकडे यांना मधुमेह असल्याने सुनंदा गायकवाड यांनी आपल्या भावाला किडनी देण्याचा निर्धार केला. माझ्या एकुलत्या एका भावाचा संसार उघड्यावर पडलेला मी पाहू शकणार नाही म्हणून त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी मूत्रपिंड देण्यासाठी सकारात्मकता दर्शविली. एवढेच नव्हे, तर शस्त्रक्रियेसाठी दोन लाख रुपयांची मदत बहीण सुनंदा गायकवाड यांनी केली. त्यांच्या या मदतीमुळे सोलापुरातील अश्‍विनी हॉस्पिटल येथे सात जून २०१७ रोजी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता दोन्ही भाऊ- बहिणींची प्रकृती चांगली आहे. शिंपले म्हणतात, ‘‘माझ्या बहिणीने माझी आई होऊन मला दुसरा जन्म दिला.’’

अनोळखी व्यक्ती पाठीराखा
नाशिक : एकमेकांना मदतीच्या वेळेस धावून जाणे, हा या नात्याचा विशेष धर्म असून, असाच काहीसा अनुभव परराज्यातील अर्चना सिंग यांना आला. जीवनाला आता काहीच अर्थ उरलेला नसून, मरण्याच्या विचारात असताना अनोळखी व्यक्तीने मदतीचा हात पुढे करत आधार दिला. आज तीच व्यक्ती भाऊ बनून सतत मदत करत आयुष्याचा पाठीराखा बनली आहे. उत्तर प्रदेश येथील अर्चना सिंग या सात वर्षांपूर्वी नाशिकला आल्या. चार वर्षांपूर्वी घरगुती कारणातून त्यांना घरच्यांनी सोडून दिले. या वेळी आपल्याला कोणीच राहिले नाही, या विचारात त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला. याचवेळी रस्त्यावर बसलेल्या असताना अचानक रस्त्यावरून जात असलेल्या अनोळखी नितीन नावाच्या व्यक्तीने त्यांना त्यांच्या दु-खाबद्दल विचारत मदतीचा हात पुढे केला. या राज्यात आपले कोणी ओळखीचे नाही. घरच्यांनी आपल्याला सोडून दिले. अनोळखी व्यक्ती, ज्याच्याशी आपले कसलेही नाते नाही, त्या व्यक्तीने मदतीचा हात पुढे केल्यामुळे विश्‍वासाने अर्चना सिंग यांनी त्यांना आपबीती सांगितली. यानंतर सदर व्यक्तीने त्यांना मार्गदर्शन करत स्वत-च्या पायावर उभे राहण्याचा सल्ला देत, मार्गदर्शन करत सतत मदतीचा हात पुढे केला. दरवर्षी नितीन हे कामानिमित्त कुठेही असले तरी गेल्या तीन वर्षांपासून रक्षाबंधनाला त्यांच्याकडून राखी बांधून घेत, त्यांच्या आयुष्यात त्यांना खंबीर साथ देत आहेत. 

Web Title: maharashtra news Rakhi Purnima Relationships