आठवले-पासवानांविरोधांत दलित युवकांमध्ये संताप 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 जानेवारी 2018

मुंबई - कोरेगाव-भीमामधील घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदच्या निमित्ताने दलित संघटना एकत्र आल्या असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले व रामविलास पासवान यांनी मात्र या घटनेच्या निषेधार्थ चकार शब्द काढला नसल्याची तीव्र भावना दलित युवक बुधवारी बोलून दाखवत होते. दरम्यान, काही दलित संघटनांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधातील संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. 

कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांचे संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात यावी, केंद्रात मंत्रिपद उपभोगणारे रामदास आठवले व रामविलास पासवान यांनी पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. भिडे आणि एकबोटे यांना सरकारने पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास दिसेल तिथे आंदोलन करू, असा इशाराही खरात यांनी दिला आहे. 

दरम्यान, दलित संघटना व दलित नागरिकांमध्ये भिडे व एकबोटे यांच्याबाबत तीव्र रोष आहे. असे असूनही सरकारने त्यांना अटक करण्याबाबत पावले उचलली नसल्याबाबतही दिवसभर संताप व्यक्त करण्यात येत होता. 

भारिप बहुजन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या दोघांविरोधात याकूब मेननप्रमाणे कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे बुधवारी बंद मागे घेतला असला तरी उद्यापासून विविध दलित संघटना स्वतंत्रपणे आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.

Web Title: maharashtra news ramdas athawale ramvilas paswan Maharashtra Bandh Koregaon Bhima Clash