शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधकांचे ढोंग - सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

कर्जत - आघाडीचे सरकार 15 वर्षे होते. त्या वेळेस त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या सोडविता आल्या नाहीत. आता मात्र त्यांचे नेते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ढोंग करत आहेत. 70 हजार कोटींचा घोटाळा केलेले शेतकऱ्यांचा विकास काय करणार, अशी बोचरी टीका कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवर केली. ते कर्जत येथे शेतकऱ्यांना मोफत खत वाटप कार्यक्रमात बोलत होते. 

कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस सुनील गोगटे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष दीपक बेहेरे, महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्ष कल्पना दास्ताने, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अशोक गायकर, विनायक पवार आदी मान्यवर उपस्थित होते. खोत यांनी सांगितले की, भाजप नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करतो. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. मीसुद्धा शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पायाला भिंगरी बांधून राज्यभर फिरलो. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न केले. तरीही विरोधक खोटे आरोप करून टीका करीत आहेत. कार्यक्रमात कर्जत तालुक्‍यातील सुमारे 400 शेतकऱ्यांना मोफत खत वाटप करण्यात आले.