समृद्धी महामार्गाला आर्थिक सहकार्य करा - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

मुंबई - राज्यातील राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंकांनी नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अनेक राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे मान्य केले आहे. हॉटेल ट्रायडंट येथे सर्व बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज झालेल्या बैठकीत फडणवीस बोलत होते. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले, की नागपूर- मुंबई हा 701 किलोमीटरचा 24 जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महामार्गामुळे महाराष्ट्र देशातील अन्य राज्यांपेक्षा पुढे जाणार असून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येणार आहे. हा महामार्ग 2020 पर्यंत पूर्ण होण्याच्या दृष्टीने शासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. नागपूरहून मुंबई, पुण्याला तसेच अन्य जिल्ह्यांतून मुंबईला येणारा शेतीमाल, अन्य उत्पादने वाहून नेणे अधिक सोयीचे होणार आहे. या प्रकल्पाच्या कामकाजामध्ये पारदर्शकता राहील. या प्रकल्पासाठी व बांधकाम विभागाच्या विविध प्रकल्पांसाठी सर्व बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सरकारला आर्थिक सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. 

या बैठकीला एस बॅंक, ऍक्‍सिस बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, बॅंक ऑफ इंडिया, युनियन बॅंक, आय.सी.आय.सी.आय. बॅंक, एस.बी.आय. बॅंक, देना बॅंक, सेंट्रल बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक, एच.डी.एफ.सी. बॅंक, इंडियन बॅंक, हुडको, एल.आय.सी., कॅनरा बॅंक या बॅंकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी मुख्य सचिव सुमित मलिक, अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, व्यवस्थापकीय सहसंचालक किरण कुरुंदकर, बांधकाम सचिव (रस्ते) चंद्रशेखर जोशी, बांधकाम सचिव (बांधकाम) अजित सगणे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.