सरकार उलथवून टाका - शरद पवार

सरकार उलथवून टाका - शरद पवार

नागपूर - ‘‘आघाडी सरकारच्या काळात बळिराजाने विक्रमी धान्याचे उत्पादन करून देशाच्या भुकेचा प्रश्‍न सोडवला. त्याच शेतकऱ्यांवर आता मोर्चे काढण्याची वेळ आली आहे. त्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री दमदाटीची भाषा करतात. शेतकऱ्यांनो, तुमच्यामध्ये सरकार उलथवून टाकण्याची ताकद आहे,’’ असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वांनाच तयारीला लागण्याचे निर्देश दिले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, रिपाइं (कवाडे), रिपाइं (गवई) या सर्व विरोधी पक्षांतर्फे नागपुरात आयोजित जनआक्रोश हल्लाबोल मोर्चात ते बोलत होते. मॉरिस कॉलेज टी-पॉइंटवर झालेल्या सभेत व्यासपीठावर विरोधी पक्षातील सर्वप्रमुख नेते उपस्थित होते.

‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार झोपले आहे. त्यांना जागे करण्यासाठी ‘हल्लाबोल’ आंदोलन केले आहे. यानंतरही हे सरकार जागे होत नसेल, तर लोकशाहीच्या मार्गाने संधी मिळेल तेव्हा सरकार उलथवून लावण्याची खबरदारी सर्वांनी घ्यावी,’’ असे स्पष्ट करत पुढील निवडणुकीत सरकारपुढे एकत्रितपणे आव्हान उभे करण्याचे संकेत त्यांनी दिले. 

पवार म्हणाले, ‘‘शेतकरी, तरुण, सामान्य नागरिकांपुढे संकट वाढत आहे. ते सोडविण्याऐवजी मुख्यमंत्री म्हणतात, पंधरा वर्षांत आम्ही काय केले? आमच्या काळात बळिराजाने देश धान्याने स्वयंपूर्ण केला. त्या बळिराजाशी आमची बांधिलकी होती. पाच वर्षांपूर्वी मी व तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी यवतमाळचा दौरा केल्यानंतर ५० दिवसांत ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले. मुख्यमंत्री कर्जमाफी देणार असल्याचे बोलतात, कधी देणार?’’ 

‘‘सरकार तुमच्या खात्यात पूर्ण रक्कम देत नसेल, तर कुठलीही देणी देणार नाही, वीजबिल भरणार नाही, सर्व जबाबदारी सरकारने घ्यावी, असा निर्धार करा. मुलांचे आयुष्य उद्‌ध्वस्त करणाऱ्या या सरकारला साथ देणार नाही, असा निर्णय घेऊन गावागावात याबाबत लोकांना सांगा,’’ असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.

मोदींवरही तोंडसुख 
‘‘पंतप्रधानांनी कर्जमाफीचे आश्‍वासन दिले होते; परंतु कर्जमाफीचा अद्याप पत्ता नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; परंतु यांच्या अंतःकरणाला पाझर फुटला नाही. समस्या सोडवायच्या नाही, यातून निर्माण झालेला लोकांचा उद्वेग, संताप वळविण्यासाठी पाकिस्तानचा उल्लेख करायचा, अशा प्रकारची भूमिका मांडली जात आहे,’’ असे नमूद करत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याबाबत जगात कुणीही शंका घेऊ शकत नाही. त्यांच्याबद्दल तसेच उपराष्ट्रपती, माजी उच्चायुक्तांबद्दल पाकिस्तानच्या मदतीने गुजरातचे मुख्यमंत्री होत असल्याचा कांगावा केला जात आहे. हे देशाच्या हिताचे नसल्याचेही ते म्हणाले.

हल्लाबोल मोर्चा निघाल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, माझ्याकडे आल्यावर मी त्यांना जागा दाखवतो. दमदाटीची भाषा केली गेली. मुख्यमंत्र्यांचा राज्य चालवण्याचा अधिकार मान्य; पण दमदाटीने जेलमध्ये टाकण्याची भाषा कराल, तर तुम्हाला उखडून टाकण्याची ताकद या देशाच्या बळिराजात आहे याबाबत शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com