शिवसेना मंत्र्यांची आज झाडाझडती 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मुंबई - राज्य सरकारचा आगामी मंत्रिमंडळ विस्तार आणि स्वपक्षातील आमदारांच्या नाराजीच्या पार्श्‍वभूमीवर उद्या शिवसेनेच्या मंत्र्यांची मातोश्रीवर झाडाझडती घेण्यात येणार आहे. 

मुंबई - राज्य सरकारचा आगामी मंत्रिमंडळ विस्तार आणि स्वपक्षातील आमदारांच्या नाराजीच्या पार्श्‍वभूमीवर उद्या शिवसेनेच्या मंत्र्यांची मातोश्रीवर झाडाझडती घेण्यात येणार आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये शिवसेनेच्या पाच कॅबिनेट; तर सात राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला. मात्र शिवसेनेला दुय्यम दर्जाची खाती दिल्याची खंत अनेक मंत्र्यांनी उघडपणे व्यक्‍त केली आहे. कमी महत्त्वाची खाती असल्याने या मंत्र्यांना फारसे अधिकार नसल्याची ओरडही होत आहे. परिणामी शिवसेना मंत्र्यांकडून कामे होत नसल्याच्या थेट तक्रारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानसभेतील आमदारांनी केल्या आहेत. एकनाथ शिंदे वगळता अन्य चार मंत्री विधान परिषदेतील आमदार असल्याने त्याबाबतची नाराजीदेखील विधानसभेतील आमदारांनी व्यक्‍त केली आहे. याबाबत शिवसेनेच्या अनेक बैठकांमध्ये आमदारांनी या मंत्र्यांना लक्ष्य करण्याची संधी सोडली नाही. आमदारांच्या तक्रारीनंतर योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन ठाकरे यांनी आमदारांना दिले होते. 

फडणवीस सरकारला येत्या ऑक्‍टोबरमध्ये तीन वर्षे पूर्ण होत असल्याने मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. यामुळे शिवसेनेतही सारे काही आलबेल नसल्याचे दिसत आहे. उद्याच्या बैठकीमध्ये मागच्या दाराने विधान परिषदेवर गेलेल्या व मंत्री झालेल्यांचे मंत्रिपद काढून घेण्याची मागणी विधानसभेतील आमदार करणार असल्याचे एका आमदाराने सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा वरदहस्त लाभलेले मंत्री आणि आमदारांमध्ये खटके उडण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. या वेळी ठाकरे यांच्याकडून काही मंत्र्यांची कानउघाडणी होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: maharashtra news shiv sena