मनातल्या नावासाठी "मातोश्री'चा आग्रह 

मृणालिनी नानिवडेकर
सोमवार, 19 जून 2017

मुंबई - भाजप-शिवसेनेतील संबंध मागील अडीच वर्षांत कमालीचे ताणले गेले असताना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज "मातोश्री'वर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईच्या महापौरपदासह सर्व बाबतीत सन्मान राखला गेला असल्याने आता सहकार्याची भूमिका स्वीकारावी, असे शहा यांनी ठाकरे यांना सांगितले असल्याचे समजते. 

मुंबई - भाजप-शिवसेनेतील संबंध मागील अडीच वर्षांत कमालीचे ताणले गेले असताना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज "मातोश्री'वर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईच्या महापौरपदासह सर्व बाबतीत सन्मान राखला गेला असल्याने आता सहकार्याची भूमिका स्वीकारावी, असे शहा यांनी ठाकरे यांना सांगितले असल्याचे समजते. 

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी "एनडीए'ने पुढे केलेल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासह केंद्र आणि राज्य सरकारला सर्वतोपरीने मदत करावी, अशी अपेक्षा शहा यांनी व्यक्त केली आहे. दोन्ही पक्षांनी या बैठकीतील तपशील अधिकृतपणे उघड केला नसला तरी शिवसेना सर्व विषयांवर सहकार्य करणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाचा विचार होणार नसेल, तर कृषिशास्त्रज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या नावाचा विचार केला जावा, असे "मातोश्री'कडून सांगण्यात आल्याचे समजते. 

आज सकाळी साडेदहाच्या सुमारास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस "मातोश्री'वर पोचले. शिवसेनेचा एकही मंत्री या बैठकीवेळी उपस्थित नव्हता. प्रारंभी उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या तिन्ही नेत्यांचे स्वागत केले. त्यानंतर शहा, फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड सुमारे एक तास चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चर्चेत मुंबई महापालिकेतील शिवसेनेला मिळालेल्या जास्त जागांची दखल घेत भाजपने महापौरपदाचा सन्मान दिला, याकडे लक्ष वेधण्यात आले. शिवसेनेने त्याची योग्य ती दखल घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. सत्तेत असूनही जाहीरपणे विरोधी वक्तव्ये करणे हा युतीधर्म नाही, असे आडून सुचविण्यात आले. 

शिवसेनेनेही कायम भाजपला साथ दिली आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर झालेली ही युती सर्वांत जुनी आहे. उन्हापावसात साथ दिलेल्या पक्षावर भाजप आरोप का करते? अशी व्यथा शिवसेनेकडून मांडण्यात आली. मुंबई महापालिकेच्या प्रचारादरम्यान "मातोश्री'लाही टीकेचे लक्ष्य करण्यात आले होते, याबाबत खेदही खेद व्यक्त करण्यात आला. अशा प्रकारची टीका कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही केली नव्हती, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच व्यक्त केली होती. त्याचाही पुन्हा उल्लेख करण्यात आल्याचे समजते. 

मोकळ्या वातावरणातील चर्चेमुळे दोन्ही पक्षांत पुन्हा एकदा संवादाचे पर्व निर्माण व्हावे, अशी अपेक्षा या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेने दोन नावांचा आग्रह धरला असला तरी, यापेक्षा वेगळे नाव समोर आल्यास शिवसेना ते मान्य करेल, याबाबतचे सर्वाधिकार पंतप्रधान मोदी यांना आहेत, असे शिवसेनेने मान्य केल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांतर्फे स्पष्ट करण्यात आले. मात्र, त्याच वेळी राष्ट्रपतिपदासाठी नवे नाव पुढे आले तर त्यावर नेत्यांशी चर्चा करून नंतर काय ते कळवले जाईल, अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका असल्याचे सांगितले जात होते. त्यातच शहा यांनी मुंबई भेटीत रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे आणि उद्धव ठाकरे या सर्व मित्रपक्षांच्या नेत्यांना भेटल्याचे पत्रक काढण्यात आले. उद्धव ठाकरे यांना अन्य सर्व नेत्यांच्या पंक्तीत बसविण्याचे हे धोरण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाले होते.