स्वबळाची डरकाळी

स्वबळाची डरकाळी

मुंबई - केंद्रात तसेच राज्यातील सत्तेत भागीदार असूनही विरोधकाच्या भूमिकेत असलेल्या, सरकारवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या, भाजपच्या "शतप्रतिशत' धोरणामुळे अधिकच घायाळ झालेल्या शिवसेनेने मंगळवारी पुन्हा "एकला चलो रे'चा नारा दिला. विधानसभा निवडणुकीनंतर काही दिवस विधानसभेत विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर पुन्हा भाजपशी सत्तेचा मांड मांडणाऱ्या शिवसेनेने लोकसभा-विधानसभेसह आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा आज केली. वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलात झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. 

केंद्रात 2014 मध्ये भाजपची सत्ता आल्यापासून शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेल्या राजकीय कुरघोडींच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना अशी भूमिका घेणार, हे संकेत काही महिन्यांपासून मिळत होते. संघटनात्मक निवडणुकांची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आज झालेल्या या बैठकीत याबाबत अधिकृत घोषणा झाली. उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी फेरनियुक्ती तसेच आदित्य ठाकरे यांची उपनेतेपदी निवड झाल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले. त्यानंतर केलेल्या भाषणात उद्धव यांनी केंद्र सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी भाषेत टीका केली. "आमच्या हिंदुत्वावर कोणताही डाग नाही. हिंदूंच्या मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी आजवर आम्ही राज्याबाहेर निवडणुका लढवत नव्हतो; मात्र आता प्रत्येक राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवू,' असेही त्यांनी जाहीर केले. 

चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता गेली आहे. आम्हाला भेकड आणि भाकड राज्यकर्ते मान्य नाहीत. ईव्हीएम गैरव्यवहार करून सत्तेत आलेले हे जाहिरातबाज सरकार जनतेला पर्याय देऊन शिवसेना खाली खेचेल, असा इशारा देतानाच "थापा मारणाऱ्यांना तुरुंगात टाका,' अशा शब्दांत त्यांनी या वेळी नरेंद्र मोदींसह भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केले. 

अदृश्‍य हातांची होळी करू! 
कोरेगाव भीमामधील घटनेचा उल्लेखही ठाकरे यांनी भाषणात केला. मराठी माणसाची विभागणी केली जात आहे; मात्र शिवसेना सर्व मराठी माणसांना एकत्र करेल. दंगली घडवून राजकीय पोळी भाजणाऱ्या अदृश्‍य हातांची शिवसेना होळी करेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

"घराणेशाही नव्हे; परंपरा' 
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेनेच्या नेतेपदी बढती दिल्यामुळे शिवसेनेवर घराणेशाहीचा आरोप होण्याची शक्‍यता आहे; पण ही घराणेशाही नव्हे, तर परंपरा असल्याचा दावा ठाकरे यांनी केला. आदित्यच्या रूपाने ठाकरे घराण्याची नवी पिढी महाराष्ट्राची सेवा करणार आहे. ही आमची परंपरा आहे. आमच्यावर घराणेशाहीची टीका झाली तरी पर्वा करत नाही, असे ते म्हणाले. 

लाल चौकात तिरंगा फडकावून दाखवा - उद्धव 
"फक्त 56 इंचाची छाती असून फायदा नाही, शौर्यही हवे. सीमेवर भारतीय जवानांच्या रक्ताचा सडा पडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशी नेत्यांसह अहमदाबादमध्ये रोड शो करतात. तेथे पतंग उडविण्याऐवजी श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावून दाखवा, असे आव्हान या वेळी दिले. "यांना फक्त निवडणुका आल्यावर पाकिस्तानची आठवण येते. आम्हाला अशा वेळी भारताचे पोलादी पुरुष सरदार पटेलांची आठवण येते,' असे ते म्हणाले. 

"गाईला मारणे, हे पाप असेल तर थापा मारणेही पाप आहे. गोवंश हत्या बंदीचा कायदा होतो, तर थापा मारणाऱ्यांविरोधातही कायदा व्हायला हवा. अशा लोकांना तुरुंगात टाकायला हवे. लोकांना भुलवून सत्ता मिळवणेही पाप आहे. दहशतवाद्यांची बाजू घेणाऱ्या "पीडीपी'च्या मांडीला मांडी लावून भाजप काश्‍मीरमध्ये लाचारपणे सत्तेत आहे. हा केवळ "फक्त बोलाची कढी आणि बोलाची भात' असा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केली. 

शिवसेनेला प्रांतवादी म्हणून संबोधले जाते; पण परदेशी नेत्यांबरोबरच्या रोड शोसाठी त्यांना अहमदाबादच का लागते? आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू भाषेतच बोर्ड लागतील, असे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू जाहीर करतात. हा प्रांतवाद नाही का, असा प्रश्‍नही त्यांनी केला. गुजरातमध्ये प्रादेशिक पक्ष सत्तेत आला असता तर आनंद झाला असता. तुमचे सरकार आणि त्यांच्या सरकारमध्ये कोणताही फरक नाही, असे ठाकरे म्हणाले. 

सर्जिकल स्ट्राइकचे श्रेय घेऊ नका! 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नौदलाबाबत केलेल्या विधानाचाही ठाकरे यांनी समाचार घेतला. आंतरराष्ट्रीय स्तरावर नौदलाची अवहेलना करता. मग लष्कराने केलेल्या "सर्जिकल स्ट्राइक'चे श्रेय का घेता, असा प्रश्‍नही त्यांनी केला. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत मंत्री यांनी कर्नाटकमध्ये कन्नडमध्ये केलेल्या भाषणाचाही त्यांनी समाचार घेतला. तुम्हाला कर्नाटकबद्दल प्रेम असेल तर तेथेच दत्तक म्हणून राहा. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यामुळे लॉटरी लागली आहे. त्याचा चांगल्या गोष्टीसाठी फायदा करा, असे असा टोलाही त्यांनी लगावला. 

दर तीन महिन्यांनी अहवाल 
नव्याने नियुक्ती करण्यात आलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दर तीन महिन्यांनी त्यांच्या कामाचा अहवाल पक्षप्रमुखांना देणे शिवसेनेने बंधनकारक केले आहे. भाजपने जाहीर केलेल्या विविध योजनांची सद्यःस्थितीही या पदाधिकाऱ्यांनी तपासून पाहावी, असे आदेशही ठाकरे यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com