स्वीडनच्या पंतप्रधानांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

मुंबई -  स्मार्ट सिटीच्या विकासासाठी उपयुक्त तंत्रज्ञान, तसेच घनकचरा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रात अधिकाधिक सहकार्य वाढविण्याबाबत स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांच्याशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक चर्चा झाली. 

स्वीडीश उद्योगसमूहांना भारतात अधिकाधिक गुंतवणूक करणे शक्‍य असलेल्या क्षेत्रांसह त्यासाठी महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या संधींची माहिती लॉफवेन यांना या वेळी देण्यात आली. स्मार्ट सिटीच्या विकासासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन तसेच सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात अधिकाधिक सहकार्य करण्याबाबतही लॉफवेन यांची मुख्यमंत्र्यांशी अतिशय चांगली चर्चा झाली. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई या वेळी उपस्थित होते.

भारत आणि स्वीडन बिझनेस लीडर्स राउंड टेबल या परिषदेला फडणवीस यांनी संबोधित करताना महाराष्ट्रात गुंतवणुकीसह औद्योगिक विकासासाठी उपलब्ध असलेल्या संधींची विस्ताराने माहिती दिली. स्वीडनकडे असलेले तंत्रज्ञान आणि महाराष्ट्रातील उपलब्ध संधी यांचा सुयोग्य मेळ घातल्यास या क्षेत्रात व्यापक सहकार्य होऊ शकते. तसेच यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन राज्याच्या डिजिटायझेशनसाठी व्यापक आराखडा तयार करता येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.