सरकारपुढे आव्हान रक्कम जमा करण्याचे 

सरकारपुढे आव्हान रक्कम जमा करण्याचे 

मुंबई - शेतकरी कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी एका आठवड्याची मुदतवाढ दिल्यावर आता थकबाकीदार सर्व शेतकऱ्यांना मुदतीत या योजनेत सामावून घेतानाच अर्जांची जलदगतीने छाननी करून दिवाळीआधी कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे असणार आहे. सरकारने एक आठवड्याची मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

कर्जमाफीचे अर्ज करण्याची सरकारने आठवडाभराची मुदत वाढवल्याने येत्या 22 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. आज (ता. 15) दुपारी चार वाजेपर्यंत 99 लाख 44 हजार 390 अर्जांची नोंदणी झाली असून 51 लाख 92 हजार 466 शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. 

सरकारने जाहीर केल्यानुसार कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्याची प्रक्रिया पुढील महिन्यापासून (ऑक्‍टोबर) सुरू होणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत होती. मात्र, विविध तांत्रिक अडचणींमुळे अजूनही ग्रामीण भागांत शेतकरी योजनेसाठी अर्ज करू शकलेले नाहीत; त्यामुळे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आणखी मुदतवाढ दिली जावी, अशी मागणी शेतकरी करीत होते. सर्वच स्तरांतून मागणीचा जोर वाढल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मुदतवाढीचा निर्णय जाहीर केला. त्याआधी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनंतर एक आठवडा मुदतवाढीची घोषणा केली. त्यानुसार आता येत्या 22 सप्टेंबरपर्यंत शेतकरी ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. 

दसऱ्यापूर्वी कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे, तर राज्य सरकार दिवाळीआधी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना दिवाळीची भेट देण्याच्या प्रयत्नात आहे. 

पुढील महिन्यात राज्यात सुमारे सात हजारहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांचा मुहूर्त साधण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. येत्या आठवड्याभरात कर्जमाफीच्या अर्ज संख्येत आणखी मोठी वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर आलेल्या अर्जांची छाननी करून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम जमा करण्यासाठी एक महिन्याहून कमी दिवस उरतात. पुढील महिन्यात 18 तारखेपासून दिवाळी सुरू होत आहे. त्याआधी कर्जमाफीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारपुढे असणार आहे. 

भारनियमनाचे आव्हान 
सध्या गेल्या काही दिवसांपासून राज्यात विजेचे भारनियमन वाढले आहे. कोळसा टंचाईमुळे वीजनिर्मिती थंडावली आहे. त्याचा मोठा परिणाम ग्रामीण महाराष्ट्रातील वीजपुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे इंटरनेट सुविधाही खंडीत होण्याच्या तक्रारी सरकारकडे येऊ लागल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर येत्या आठवड्याभरात अजूनही अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांना मुदतीत कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. त्यानंतर सरकारकडून मुदतवाढीची शक्‍यता नसल्याने या कालावधीत शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com