साखरेच्या भावात 100 रुपयांची घसरण 

 साखरेच्या भावात 100 रुपयांची घसरण 

सोमेश्वरनगर - केंद्र सरकारने कच्च्या साखरेची केलेली आयात आणि कारखान्यांच्या साखरसाठ्यावर लादलेले निर्बंध यामुळे साखरेच्या भावात प्रतिटन शंभर रुपयांची घसरण झाली आहे. निर्णयापूर्वी साखरेचे दर 3650 रुपये प्रतिक्विंटल होते, ते गुरुवारी 3550 ते 3530 रुपयांपर्यंत घसरले आहेत. ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही घट झाल्याने कारखान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे. आगामी हंगामातील "एफआरपी'वरही परिणाम होणार आहे. 

एस साखरेचे (लहान) भाव जुलैअखेर 3605 ते 3625 रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास होते. ऑगस्टमध्ये यात काहीशी वाढ होऊन 3645 ते 3650 रुपयांपर्यंत पोचले. यामुळे मागील हंगामाचा अंतिम भाव आणि आगामी हंगामाची "एफआरपी' समाधानकारक मिळणार, अशी आशा शेतकऱ्यांना लागली होती. कारखान्यांचे मागील चार- पाच वर्ष बिघडलेले आर्थिक ताळेबंद जाग्यावर येईल, असे वाटू लागले होते. परंतु, साखरेच्या भावावर नियंत्रणासाठी केंद्र सरकारने साठ्यावर निर्बंध घालण्याचा आदेश 28 ऑगस्टला दिला. यामध्ये साखरेचा शिल्लक साठा सप्टेंबरअखेर 21 टक्के तर ऑक्‍टोबरअखेर 8 टक्के उरला पाहिजे, अशी सक्ती केली. यामुळे ज्यांनी ऐन दिवाळीत नैसर्गिक दरवाढीचा फायदा घेण्यासाठी साखर राखून ठेवली होती त्यांना एकदम साखर विकावी लागत आहे. अशात पुन्हा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पंचवीस टक्के आयातशुल्क आकारून तीन लाख टन कच्च्या साखरेची आयात केली. या दोन्ही निर्णयाने भावाची घसरण आणखी तीव्र झाली. 28 ऑगस्टला साखरेचे दर 3645 ते 3650 रुपये प्रतिक्विंटल इतके होते. गुरुवारी झालेल्या साखरविक्रीत पुणे जिल्ह्यातील एका कारखान्याने 3550 रुपये भावाने सुमारे वीस हजार पोत्यांची विक्री केली. सोमेश्वर कारखान्याने 3580 रुपयांनी साखर खुली केली होती, परंतु त्याची विक्री होऊ शकली नाही. सरकारी आदेशानुसार साखरसाठा शिल्लक ठेवण्यासाठी कारखान्यांना मिळेल त्या भावाने साखर विकावी लागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एका कारखान्याने अवघ्या 3530 रुपये प्रतिक्विंटल भावाने साखर विकली. 

एकीकडे ज्यांचा कोटा पूर्ण झाला आहे, ते दहा- वीस रुपये जादा भावाने साखर विक्रीसाठी ठेवत आहेत. त्यांना अजिबात उठाव नाही. दुसरीकडे ज्यांच्याकडे कोटा शिल्लक आहे, त्यांची लाखो पोती बाजारात येत आहेत. यामुळे साखरेच्या भावात ऐन दिवाळीच्या तोंडावर घसरण होत आहे. 

निर्णय उत्तर प्रदेशसाठी फायद्याचा 
हा निर्णय उत्तर प्रदेशातील खासगी कारखानदारीच्या लॉबीला फायदेशीर तर महाराष्ट्रासाठी तोट्याचा ठरला आहे. उत्तर प्रदेशातील कारखाने आधीच साखर विकून मोकळे झाले असून ऑक्‍टोबरमध्ये त्यांचा हंगाम सुरू करून नवी साखर बाजारात आणणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्राचा साखरसाठा घटणे उत्तर प्रदेशासाठी फायद्याचे होते. तेथे शंभर लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. 
दुसरीकडे महाराष्ट्रात 1 नोव्हेंबरपासून गाळप सुरू होणार आहे. उत्तर प्रदेशाची साखर राजस्थानला कमी वाहतूक खर्चामुळे स्वस्त भावात मिळाल्याने महाराष्ट्राचा तो ग्राहक घटला आहे. अशात दक्षिणेतील बंदरांवर कच्ची साखर आयात केल्याने तेथील ग्राहकांतही घट झाली आहे. 

"विक्रीची द्विस्तरीय रचना करावी' 
घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार अशोक पवार म्हणाले, ""एकीकडे खुली अर्थव्यवस्था म्हणायचे आणि दुसरीकडे साखरसाठ्यावर निर्बंध घालायचे, आयात करायची. साखर उत्पादकाला आता दोन पैसे अधिक मिळण्याची संधी होती. कारखान्यांनी सरकारकडूनच कर्ज घेऊन मागील दोन हंगामाची "एफआरपी' दिली होती ती तूट भरून काढायची होती. आयातीमुळे कारखाने आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडते, पण उद्योगांना फायदा होतो. त्याऐवजी ग्राहकाला कमी दर आणि उद्योगांना जास्त अशी द्विस्तरीय साखरविक्रीची रचना करावी. 

28 ऑगस्टनंतर साखरेचे घटत गेलेले एका कारखान्याचे भाव (प्रतिक्विंटलचे रुपयांत) 
28 ऑगस्ट - 3645, 4 सप्टेंबर- 3625, 11 सप्टेंबर - 3605, 14 सप्टेंबर - 3595, 18 सप्टेंबर - 3580. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com