देवी रडू लागली आहे...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

भवानीनगर - काही वर्षांपूर्वी देव दूध पितो, अशा अफवांनी राजकीय-सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली होती. आता देवी रडू लागल्याची नवीन अफवा पसरली असून, एक मूल असलेली कुटुंबे रात्रभर जागत आहेत. खरंच देवी रडतेय का, हे पाहण्यासाठी सणसर, भिगवण परिसरात रात्रीच्या वेळी नागरिकांनी गर्दी केली, तर संध्याकाळी दारापुढे सडा, रांगोळी घालणारी कुटुंबेही पाहावयास मिळाली.

अंधश्रद्धेचा हा बाजार मांडणारे फोन गेल्या दोन दिवसांपासून पुणे, मुंबई, ठाण्यासारख्या शहरांतून आले आहेत. शहरांमध्ये राहणाऱ्यांनी गावाकडच्या कुटुंबीयांशी फोनवर संपर्क साधून घरातल्या देवीच्या फोटोकडे पाहा, मंदिरात जाऊन देवी रडतेय कशी बघा, असे संदेश दिले आणि त्यानंतर गावागावांत ‘रडणाऱ्या’ देवीचा आवाज घुमू लागला आहे. नवरात्र तोंडावर असल्याने लोकांमध्ये धार्मिक भावना अधिक उत्तेजित करण्यासाठी सोयीस्कर असे निरोप दिले जात असून, त्यातही ज्या कुटुंबांना एक मुलगा आहे, अशा कुटुंबांनी आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी दारात सडा घालून रांगोळी काढून त्यावर रात्री बारापर्यंत दिवा लावावा, तो विझू नये याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही यामध्ये दिल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून हा प्रकार सुरू असून, त्यासाठी अनेकांना आपल्या झोपेचे खोबरे करून घ्यावे लागले आहे. भिगवण परिसरात रविवारी रात्रीच्या वेळी शेकडो भाविक मंदिरात देवीच्या मूर्तीकडे टक लावून पाहत होते. हळूहळू गावागावांत त्याचे लोण पोचले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने केशाकर्षण पद्धतीने दगडी मूर्ती ओल्या झाल्याचे पाहायला मिळते; मात्र त्याला अफवांची जोड देऊन अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा उद्योग सध्या पद्धतशीरपणे सुरू आहे. दुसरीकडे मागील दोन दिवसांत पुण्यातील सोवळे-ओवळे प्रकरणावरून ताणलेल्या सामाजिक संबंधांकडून लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठीही ही अफवा पसरवली जात असल्याची चर्चा सुरू आहे.

टॅग्स