राज्यातील 82 पेट्रोल पंपांत मापात पाप 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

ठाणे - ठाणे पोलिसांनी जून महिन्यात पेट्रोल पंपातील मापात पाप करून इंधनचोरी करणाऱ्या पंपचालकांवर सुरू केलेल्या कारवाईत आतापर्यंत 18 जिल्ह्यांतील 141 पेट्रोल पंपांवर छापे टाकले आहेत. त्यापैकी 82 पेट्रोल पंपांत इंधनचोरी होत असल्याचे उघड झाले असून, 59 पेट्रोल पंपांना क्‍लीन चिट मिळाली आहे. यात इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या 72 पेट्रोल पंपांवर छापे घालण्यात आले. त्यापैकी 26 पेट्रोल पंपांत चोरी होत नसल्याचे स्पष्ट झाले; तर हिंदुस्थान पेट्रोलियमच्या 51 पैकी 27 पेट्रोल पंपांत पेट्रोलचोरी सुरू होती. भारत पेट्रोलियमच्या 12 पैकी चार पेट्रोल पंपांत इंधनचोरी सुरू होती.

ठाणे - ठाणे पोलिसांनी जून महिन्यात पेट्रोल पंपातील मापात पाप करून इंधनचोरी करणाऱ्या पंपचालकांवर सुरू केलेल्या कारवाईत आतापर्यंत 18 जिल्ह्यांतील 141 पेट्रोल पंपांवर छापे टाकले आहेत. त्यापैकी 82 पेट्रोल पंपांत इंधनचोरी होत असल्याचे उघड झाले असून, 59 पेट्रोल पंपांना क्‍लीन चिट मिळाली आहे. यात इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या 72 पेट्रोल पंपांवर छापे घालण्यात आले. त्यापैकी 26 पेट्रोल पंपांत चोरी होत नसल्याचे स्पष्ट झाले; तर हिंदुस्थान पेट्रोलियमच्या 51 पैकी 27 पेट्रोल पंपांत पेट्रोलचोरी सुरू होती. भारत पेट्रोलियमच्या 12 पैकी चार पेट्रोल पंपांत इंधनचोरी सुरू होती. एस्सरच्या सहापैकी पाच पेट्रोल पंपांत इंधनचोरी होत असल्याचे उघड झाले आहे. पेट्रोलचोरी करणारे पंप पोलिसांनी सील केले आहेत. 

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून जून महिन्यात पेट्रोल पंपांवर कारवाई सुरू झाली असून या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रकाश नुलकर यालाही पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी काहींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. इंधनचोरी होत असलेल्या पंपांमधून पोलिसांनी 262 पल्सर, 20 सेन्सर कार्ड, 111 कंट्रोल कार्ड, 100 की-पॅड हस्तगत केले असून त्यांचीही तपासणी केली जात आहे. पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग, शाखा- एकचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकातर्फे राज्यातील विविध ठिकाणी कारवाई सुरू ठेवण्यात आली आहे. 

कारवाई केलेले पेट्रोलपंप 
ठाणे - 37 
नाशिक - 15 
रायगड - 11 
पुणे - 22 
सातारा - 6 
मुंबई - 5 
औरंगाबाद - 6 
रत्नागिरी - 2 
नागपूर - 5 
धुळे - 3 
अमरावती - 1 
यवतमाळ - 2 
चंद्रपूर - 2 
जळगाव - 2 
कोल्हापूर - 8 
सांगली - 7 
पालघर - 6 
नगर - 1 
एकूण - 141