दूधदरावरून विधानसभेत खडाजंगी 

दूधदरावरून विधानसभेत खडाजंगी 

मुंबई - राज्य सरकारच्या धोरणामुळे सहकारी दूध संघांना दर देणे परवडत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी आज विधानसभेत सरकारला, विशेषत: पशुसंवर्धन व दुग्धोत्पादनमंत्री महादेव जानकर यांना धारेवर धरले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार आणि जानकर यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी उडाली. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, दूध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रमुखांच्या उपस्थितीत अध्यक्ष हरिभाऊ बागडेंच्या दालनात बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन द्यावे लागले. 

सरकारने दूध संघांसाठी ठरविलेल्या दरासंबंधीच्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान अजित पवार यांनी जानकरांवर जोरदार हल्ला चढविला. जागतिक बाजारात दूध भुकटीचे दर कोसळल्याचा मोठा फटका राज्यातील सहकारी दूध संघांना सहन करावा लागत आहे. सध्या दूध उत्पादनवाढीचा काळ असल्याने संघांसमोर अतिरिक्त दुधाची समस्या आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार 27 रुपये प्रतिलिटर दराने गाईचे दूध खरेदी करताना संघांना प्रतिलिटर सुमारे नऊ रुपयांहून अधिकचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे हंगामात दूध संघांना सुमारे 450 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागण्याची शक्‍यता आहे. दूधदराबाबत सहकारी दूध संघांवर दबाव आणणाऱ्या राज्य सरकारकडून गुजरातच्या अमूल आणि राज्यातील इतर खासगी दूध संघांकडून कमी दर देऊनही बोटचेपे धोरण राबविले जात आहे, असा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला होता. राज्य सरकारच्या 19 जूनच्या शासन निर्णयानुसार 3.5 फॅट आणि 8.5 "एसएनएफ' असलेल्या गाईच्या दुधाला प्रतिलिटर 27 रुपये दर देणे संघांवर बंधनकारक आहे. तसेच, दूध विक्रीचे दरही वाढविण्यात येऊ नयेत, असे म्हटले असल्याचे विरोधकांनी स्पष्ट केले. 

राज्य सरकारच्या धोरणामुळे सहकारी दूध संघांना दर देणे परवडत नसल्याची बाब अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. जानकर म्हणाले, ""हा निर्णय शेतकऱ्यांसाठीच घेतलेला असल्याने जे दूध संघ हा दर देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.'' यावर सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. जानकर यांच्या या उत्तराने समाधान न झाल्याने अजित पवार यांनी राज्य सरकारने ठरविलेला दर कोणत्या संघाला परवडत आहे, अशी विचारणा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना केली. या वेळी बागडे यांनीही राज्य सरकारने ठरविलेला दर आमच्या दूध संघाला परवडतच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना 21 ते 22 रुपये प्रतिलिटर दराने पैसे दिले जात असल्याचे सांगितले. त्यामुळे दूधदराबाबत आग्रही भूमिका घेणाऱ्या महादेव जानकरांची अडचण झाली. 

कॉंग्रेसचे सुनील केदार यांनी याच अनुषंगाने प्रश्न उपस्थित करत अध्यक्षांच्या दूध संघावर काय कारवाई करणार, असा उपप्रश्न उपस्थित केला. त्यावर जानकर यांनी, जे दूध संघ सरकारने निर्धारित केलेला दूध दर देत नाहीत, त्याची माहिती अधिकाऱ्यांची समिती घेत आहे. त्या संदर्भात लवकरच एक अहवाल सादर केला जाणार असून, त्यानंतरच निर्णय घेणार असल्याचे गुळमुळीत उत्तर दिले. 

सहकारी संस्था आणि दूध संघ सुरू करायला अक्कल लागते, या संस्था मोडीत काढायला अक्कल लागत नाही. जानकर दूध संघ मोडीत काढायला निघाले आहेत. 
- अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते 

सरकारने हा निर्णय शेतकऱ्यांसाठीच घेतलेला असल्याने जे दूध संघ सरकारने निश्‍चित केलेला दर देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. 
- महादेव जानकर, पशुसंवर्धन व दुग्धोत्पादनमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com