महिला तस्करी रोखावीच लागेल - मुख्यमंत्री 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 जुलै 2017

मुंबई  - "महिला तस्करी' हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा काळा व्यवसाय आहे. शिवाय दहा वर्षांत तो अमली पदार्थ व्यवसायाच्या पुढे जाऊन जगातील सर्वाधिक मोठा काळा व्यवसाय होण्याची भीती आहे. कोणत्याही परिस्थितीत हे आपल्याला रोखावे लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केले. 

मुंबई  - "महिला तस्करी' हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा काळा व्यवसाय आहे. शिवाय दहा वर्षांत तो अमली पदार्थ व्यवसायाच्या पुढे जाऊन जगातील सर्वाधिक मोठा काळा व्यवसाय होण्याची भीती आहे. कोणत्याही परिस्थितीत हे आपल्याला रोखावे लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केले. 

महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टीस मिशनच्या वतीने "महिला तस्करी' या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. महिला तस्करी रोखण्यासाठी महिला आयोग, इंटरनॅशनल जस्टीस मिशन यांच्यासह जगातील विविध देशांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा आहे, असे उद्‌गारही मुख्यमंत्र्यांनी काढले. 

आयटीचा प्रभावी वापर आवश्‍यक 
मुख्यमंत्री म्हणाले की, मानवी तस्करीत आतापर्यंत फक्त गरीब, वंचित घटक फसत होते; पण माहिती तंत्रज्ञानाच्या (आयटी) काळात आता सधन, सुशिक्षित घरातील मुलीही फसत आहेत. यातील गुन्हेगार हे "आयटी'मधील मास्टर असतात. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी आपल्यालाही तितक्‍याच प्रभावी उपाययोजना करण्याबरोबर "आयटी'चाही प्रभावी वापर करावा लागेल. महिलांच्या तस्करीचा गुन्हा राज्य आणि देशांच्या सीमा भेदून केला जातो. त्यामुळे हे रोखण्यासाठी सर्व देशांचा एकत्रित पुढाकार महत्त्वाचा आहे. तसेच त्यातून सुटका झालेल्या महिलांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 

उद्‌घाटनास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, अभिनेता अक्षय कुमार, महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, इंटरनॅशनल जस्टीस मिशनचे सीईओ गॅरी हॉगेन, सेकंड लेडी ऑफ घाना हाजिया समीरा बाऊमिया उपस्थितीत होत्या. जुहू येथे सुरू असलेल्या या परिषदेत मानवी हक्क, बाल हक्क, महिलांचे अधिकार आदी विषयांवर कार्य करणारे विविध देशांतील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. 

जिल्ह्यांमध्ये विशेष विभाग 
मानवी तस्करीचे प्रमाण असलेल्या राज्याच्या 12 जिल्ह्यांमध्ये विशेष विभाग स्थापन करण्यात आले आहेत. याशिवाय या गुन्ह्यांचे खटले चालविण्यासाठी विशेष न्यायालयही सुरू करण्यात आले आहे. महिला तस्करीला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.