नगररचनेत हवी सायकलला प्रतिष्ठा - तंज्ञांचे मत

नगररचनेत हवी सायकलला प्रतिष्ठा -  तंज्ञांचे मत

सांगली -  इंधन दराचा भडका, वाहनांमुळे होणारे प्रदूषण, रस्ते अपघात, वाढती स्थूलता या प्रश्‍नांवर सायकलचा शक्‍य तितका वापर हेच परिणामकारक उत्तर आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

अडगळीतील सायकलला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देताना भीती वाटावी, अशा गर्दीतील सायकल प्रवास सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. प्रगत राष्ट्रांप्रमाणे आपल्याकडील शहरांमध्ये स्वतंत्र सायकल ट्रॅकची निर्मिती, मोफत किंवा माफक भाड्यात सायकल पुरवठा केंद्रे करावीत. त्याच्या गुंतवणुकीच्या तुलनेत पुढच्या पिढ्यांना मिळणारे लाभ कित्येक पटीने अधिक आहेत. त्यामुळे नगररचनेतच सायकलला प्रतिष्ठा मिळावी, अशी अपेक्षा आहे.   

तरुणांत बॉडी बनवण्यासाठी आणि चाळिशीनंतर आरोग्याचे प्रश्‍न जटिल होत असल्याने जीमला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. बारा-पंधरा वर्षांपूर्वी पुरुषांच्या तुलनेत जीममध्ये महिलांचे प्रमाण २ टक्के होते, ते आता २२ ते २५ टक्‍क्‍यांवर पोचल्याचे जीम संचालकांचे आकडे सांगतात. त्या तुलनेत सायकल वापराचा उलटा प्रवास झाला. वैद्यकीय तज्ज्ञ त्यात सुधारणांसाठी लोकांना सायकल चालवण्याचा सल्ला देतात. जीममध्ये चांगला मार्गदर्शक नसेल तर जीव गमवण्यापर्यंतची हानी होऊ शकते. सायकलिंग वाढवणे आरोग्याबरोबरच पर्यावरण स्वास्थ्यासाठीही लाभदायक आहे, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सायकलपटू दत्ता पाटील, आयपीएस अधिकारी दत्तात्रय शिंदे, ऐंशी वर्षांचे सायकलपटू गोविंदकाका परांजपे यांनी मांडले. 

थोडं गणितात पाहू
दुचाकीला पेट्रोल लागते. सायकल चालविताना आपण शरीराचे इंधन वापरतो. सर्वसामान्य माणूस १०० कॅलरीज वापरून ५ किलोमीटर सायकल चालवू शकतो. वाहनांत १०० कॅलरीज जाळल्या, तर केवळ ३०० फूट प्रवास होतो. रोज अर्धा तास सायकल चालवणे म्हणजे भरपेट जेवणातील बहुतांश कॅलरीज जाळणे होय. 

सायकलला सन्मान
स्पेनमध्ये सायकलसाठी स्वतंत्र रस्ते आहेत. लोकांनी अधिकाधिक सायकल वापरावी आणि प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी प्रयत्न होतात. इस्राईलची राजधानी तेल अवीव अत्याधुनिक आणि स्वच्छ, सुंदर शहर आहे. तेथे जागोजागी सायकल सेंटर आहेत. कुठेही सायकल घ्या, इप्सित स्थळी जा, तेथील सेंटरवर सायकल लावा आणि पुढे निघा, अशी सोय आहे. जगभरात पर्यावरण संवर्धनार्थ सायकलचा सन्मान वाढवला जातोय.  

सायकल चालविणे हा सगळ्यात उत्तम, सोयीचा, कमी खर्चाचा व आरोग्यदायी व्यायाम आहे. पायाच्या स्नायू व कमरेस सायकलिंग उपयुक्त आहे. चांगल्या हवेत सायकलिंग केल्याने फुफ्फुस आणि हृदयाची कार्यक्षमता वाढते. सायकलचा खर्च जीमच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे. व्यायामाव्यतिरिक्त कामासाठीही सायकल वापरा. त्यातून पैशांची बचत आणि प्रदूषण नियंत्रण होईल. सार्वजनिक आरोग्यात भर पडेल. स्थूलता नियंत्रणासाठी सायकलिंग उपयुक्त आहे. संधिवाताचा त्रास असणाऱ्यांनी घरातल्या घरात सायकलिंग करावे. 
- डॉ. अनिल मडके, छातीरोगतज्ज्ञ, सांगली

सायकलचे प्रयोग
 -   २०१२-१३ मध्ये सांगलीचे तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. रवींद्र शिसवे यांनी सायकलवरून पेट्रोलिंगचा प्रयोग राबवला. त्यामागे चारचाकीपेक्षा सायकलवरून घडामोडींवर लक्ष ठेवणे परिणामकारक ठरते, शिवाय, पोलिसांमधील ढेरपोटेपणा घटून त्यांचा फिटनेस वाढतो, असा उद्देश होता.
-  सध्या सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे सायकलपटू आहेत. त्यांनी जिल्हाभर लोकसंवाद वाढवण्यासाठी सायकलवरून दौरा केला. पंधरा दिवस पोलिस अधिकाऱ्यांचे पथक सायकलवरून जिल्हाभर फिरले. 
 -   सांगलीवाडीतील दत्ता पाटील अनवाणी जागतिक सायकलिंग स्पर्धेत सहभाग घेतो. यंदा तो बाराव्यांदा हिमालय सर करायला गेलाय. जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया देशांतील मासिकांनी दत्तावर भरभरून लिहिलंय. 
  -  झोपडपट्टीतील हुसेन कोरबूच्या सायकलिंगच्या वेडाने त्याच झोपडीत शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मोठ्या थाटात आला आहे
-  माधवनगरचे गोविंदकाका परांजपे ऐंशीव्या वर्षीही सायकलवरून फिरतात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com