‘लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोगाम’ म्हणजे लॅब ऑफ अपॉर्च्युनिटी

‘लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोगाम’ म्हणजे लॅब ऑफ अपॉर्च्युनिटी

मुंबई - ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वाखाली ‘लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोगाम’ची माहिती आज ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिली. अमेरिका ज्याप्रमाणे लॅण्ड ऑफ अपॉर्च्युनिटी आहे तशीच ‘लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोगाम’ म्हणजे लॅब ऑफ अपॉर्च्युनिटी आहे. हे नेतृत्वाच्या दिशेने पहिले पाऊल आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) नेतृत्व विकास परिषदेच्या निमित्ताने ही माहिती देण्यात आली.

‘यिन’च्या नेतृत्व विकास परिषदेच्या निमित्ताने युवकांशी संवाद साधताना अभिजित पवार म्हणाले, की नेतृत्व करताना स्वप्न पाहणे गरजेचे आहे. ही स्वप्ने फक्त स्वत:च्या विकासाची नसावीत, तर ती समाजाच्या, संपूर्ण मानव जातीच्या विकासासाठी असायला हवीत. त्यासाठी देश, राज्य, शहर आणि गावाच्या सीमांमध्ये गुंतून न राहता संपूर्ण विश्‍वासाठी स्वप्न बघायला हवे. तुमचे स्वप्न प्रत्यक्षात न उतरण्यासाठी हजारो-लाखो कारणे लोक सांगतील. मात्र ते पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे एक कारण असले  तरी कामाला सुरुवात करा, असा मोलाचा सल्ला त्यांनी युवकांना दिला. चंद्रावर चालणे, विमानातून फिरणे हे कधी काळी स्वप्न होते; पण आता ते शक्‍य आहे, अशा शब्दांत त्यांनी स्वप्न पाहण्याचे महत्त्व सांगितले. नुसती चर्चा, संकल्पना महत्त्वाची नाही तर ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काम केले पाहिजे. कृती महत्त्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले. पवार यांनी संगणकीय सादरीकरण करून स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे सात महत्त्वाचे टप्पे युवकांना समजावून सांगितले. सध्याची पदवी म्हणजे कारखान्यातील असेंब्लिंग लाईन आहे. मशीन लर्निंगची पद्धत आहे. फक्त पाठांतरावर भर दिला जातो. जर्मन विद्यापीठांनी नोकऱ्या मिळाव्यात म्हणून कारखान्यांची गरज ओळखून त्यांचे अभ्यासक्रम तयार केले. तोच अभ्यासक्रम जगाने गिरवला; पण आता तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहे. येत्या एक-दोन दशकांत साचेबद्ध शिकलेले विद्यार्थी स्पर्धेतून बाहेर पडू शकतील. त्यासाठी चार भिंतींबाहेर शिकायला हवे. खूपदा आपण काय शिकतोय, तेही समजत नाही. ही परिस्थिती बदलायला हवी. शिक्षण आणि ज्ञान हे फक्त चार भिंतींपुरते मर्यादित नाही. त्याबाहेरही ज्ञान मिळत असते. ते कमवायला हवे, असेही पवार यांनी नमूद केले. परीक्षेत गुण किती मिळतात याला महत्त्व नाही; तर तुम्ही आयुष्यात काय करता, ते महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

सुट्टी विसरून जायला हवी 
शिक्षण घेत असताना आपण शनिवार-रविवार सुटीचा दिवस न पाहता अभ्यास करत असतो; पण नोकरीला लागल्यावर पाच दिवसांचा आठवडा हवा असतो. ही काय पद्धत आहे? सतत काम करत राहिले पाहिजे, असे अभिजित पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणजे विद्यापीठ 
देवेंद्र फडणवीस म्हणजे स्वत: एक विद्यापीठ आहेत. त्यांच्या कामातून खूप काही शिकण्यासारखे आहे, अशा शब्दात अभिजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. नेतृत्व, मूल्य, व्हिजन आदी सर्वच गोष्टी मुख्यमंत्र्यांकडून शिकण्यासारख्या आहेत. त्यांनी ते आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत केलेल्या निःस्वार्थी कामातून त्यांनी त्याचे दाखले दिले आहेत, असेही पवार यांनी नमूद केले.

सर्वोत्तम शहर बनवण्याचे स्वप्न
युवकांना स्वप्ने बघायला सांगताना अभिजित पवार यांनी स्वतः पाहिलेले स्वप्नही मांडले. नागरिकांचे आयुष्य सर्वोत्तम असेल असे एक शहर निर्माण करायचे आहे, असे माझे स्वप्न असल्याचे ते म्हणाले. गुगलने अमेरिकेत असे शहर निर्माण करण्याची घोषणा केली असल्याचीही माहिती त्यांनी दिली. 

शबरीने ज्ञान दिले... 
शबरीने रामाला उष्टी बोरे नाही तर ज्ञान दिले होते. ज्ञान हे एकाकडून दुसऱ्याकडे जात असते. उष्टी बोरे हे त्याचेच द्योतक होते, असेही अभिजित पवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com