उन्हाचा चटका वाढला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

पुणे - राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, 16 जिल्ह्यांतील कमाल तापमानाच्या पाऱ्याने रविवारी चाळीशी ओलांडली. पुढील चोवीस तासांमध्ये शहरातील तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. राज्यात अकोला येथे सर्वाधिक म्हणजे 42.8 अंश सेल्सिअसची नोंद झाली. पुण्यातही या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद रविवारी झाली. शहरात कमाल तापमानाच्या पाऱ्याने 38.8 अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली. 

पुणे - राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, 16 जिल्ह्यांतील कमाल तापमानाच्या पाऱ्याने रविवारी चाळीशी ओलांडली. पुढील चोवीस तासांमध्ये शहरातील तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. राज्यात अकोला येथे सर्वाधिक म्हणजे 42.8 अंश सेल्सिअसची नोंद झाली. पुण्यातही या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद रविवारी झाली. शहरात कमाल तापमानाच्या पाऱ्याने 38.8 अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली. 

उत्तर भारतात निर्माण झालेल्या "वेस्टर्न डिस्टर्बन्स' आणि दक्षिणेतील चक्राकार वाऱ्यांची स्थिती, यामुळे मार्चच्या सुरवातीपासून हवामानात बदल झाला होता. कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा पाच ते सहा अंश सेल्सिअसने कमी झाला होता. ही परिस्थिती पूर्ववत होत असल्याने राज्यात खऱ्या अर्थी उन्हाळा जाणवायला सुरवात झाली. 

राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील कमाल तापमानाचा पारा वेगाने वाढला आहे. तेथील तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. त्याचवेळी पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथेही सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद आणि परभणीसह विदर्भातील सर्वच प्रमुख जिल्ह्यांमध्ये तापमान तीन ते पाच अंश सेल्सिअसने वाढले आहे. 

कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून (ता. 27) पुणे परिसरात दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहणार असून, उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशचा ईशान्य भाग ते मध्य प्रदेशचा दक्षिण भाग, मराठवाडा, विदर्भात तयार झालेले द्रोणीय क्षेत्र विरून गेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उष्णतेत वाढ झाली आहे. राज्यात कोरडे हवामान असल्यामुळे दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. 

मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली, तर कोकण, गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. 

दृष्टिक्षेपात राज्याचे तापमान (सर्व आकडे अंश सेल्सिअसमध्ये, कंसात सरासरीपेक्षा वाढलेले तापमान) 
पुणे 38.8 (2.5), जळगाव 41 (2.2), कोल्हापूर 38.9 (2.2), महाबळेश्‍वर 33.7 (2.4), मालेगाव 42.4 (5.1), नाशिक 40.1 (4.1), सांगली 40 (2.3), सातारा 38.6 (3), सोलापूर 41.4 (2.7), सांताक्रूझ 35.3 (2.5), अलिबाग 31.9 (0.9), रत्नागिरी 32.2 (0.6), डहाणू 32.4 (1.2), औरंगाबाद 40.1 (3.6), परभणी 41.3 (3), अकोला 42.8 (4.5), अमरावती 41 (2.7), बुलडाणा 39.8 (4.9), चंद्रपूर 41.4 (2.3), गोंदिया 41.2 (3.8), नागपूर 40.9 (3.3), वाशीम 40, वर्धा 41.5 (3.5), यवतमाळ 41 (3.5) 

Web Title: maharashtra Temperature high