"जलयुक्त'मधून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

रहिमतपूर - दुष्काळमुक्तीचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. केवळ संकल्प न करता रोज होत असलेले श्रमदानाचे काम महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नागरिक, शेतमजूर हे सर्व जण जलयुक्त शिवार योजनेमध्ये उतरले आहेत. या योजनेचे काम असेच पुढील दोन तीन वर्षे सुरू राहिल्यास महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

रहिमतपूर - दुष्काळमुक्तीचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. केवळ संकल्प न करता रोज होत असलेले श्रमदानाचे काम महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नागरिक, शेतमजूर हे सर्व जण जलयुक्त शिवार योजनेमध्ये उतरले आहेत. या योजनेचे काम असेच पुढील दोन तीन वर्षे सुरू राहिल्यास महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

न्हावी बुद्रुक व पवारवाडी (ता. कोरेगाव) येथील "जलयुक्त'अंतर्गत सुरू असलेल्या कामांची आज मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, आमदार बाळासाहेब पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा कृषी अधीक्षक जितेंद्र शिंदे, भाजपचे नेते अतुल भोसले, मनोज घोरपडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, "रोहयो'चे उपजिल्हाधिकारी संजय पाटील, जिल्हा उपवन संरक्षक अनिल अंजनकर, जिल्हा कृषी अधिकारी विठ्ठल भुजबळ, तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे, प्रांताधिकारी हिंमत खराडे, तहसीलदार शीतल वाणी, गटविकास अधिकारी सावित्री खरडे उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांनी केले श्रमदान 
न्हावी बुद्रुक येथील तलावातील गाळ काढून शेतकऱ्यांच्या शिवारात टाकून सुपीक शेती करण्यासाठी "गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजनेचा प्रारंभ फडणवीस यांच्या हस्ते झाला. तलावाची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांनी स्वतः श्रमदानही केले. या वेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना ते म्हणाले, ""हजारो लोक श्रमदान करीत आहेत. हे एक पथदर्शी काम आहे. पाण्याचा संचय हाच आपल्याला विकासाकडे नेणारा आहे. आपल्या मेहनतीने आपण आपला विकास करू शकतो. ग्राम समृद्ध करू शकतो. पाण्याशिवाय जीवन नाही. पाण्यासाठी काम करणे देश कार्य आहे. निसर्गाने आपल्याला दिले आहे त्याचे योग्य संवर्धन केल्यास कधीही समाज गरीब, उपाशी, तहानलेला राहणार नाही.'' 

पवारवाडीतील नर्सरीला भेट 
पवारवाडी येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, ""पवारवाडी येथे श्रमदानातून कामे उत्तम प्रकारे चालू आहेत. पवारवाडीची भौगोलिक स्थिती पाहता पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा होऊन पवारवाडीसह शेजारी असणाऱ्या गावांतील पाणीपातळीही वाढू शकेल.'' या वेळी त्यांनी वृक्ष लागवड करून वन विभागाच्या नर्सरीस भेट दिली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत न्हावी बुद्रुक ते आर्वी रस्त्याचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. 

न्हावी बुद्रुकचे नाव "जयपूर' करू 
न्हावी बुद्रुक येथे जलसंधारणाची कामाची पाहणी करताना आपल्या गावचे नाव बदलायचे आहे, हे खरे आहे का, अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी केली. ग्रामस्थांनी "जयपूर' असे नामकरण करावे, अशी विनंती केली. त्यास मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तुमच्या गावचे नाव नक्की बदलून देऊ, असे आश्‍वासन दिले. 

"मुद्रा' योजनेंतर्गत कर्जासाठी कॅम्प 
न्हावी बुद्रुक येथील ग्रामस्थांनी मुद्रा कर्ज योजनेंतर्गत कर्ज देण्यास बॅंका टाळाटाळ करीत असल्याची तक्रार थेट मुख्यमंत्र्याकडेच केली. त्यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना सांगून तुमच्या गावात विशेष कॅम्प लावून मुद्रा योजनेंतर्गत बेरोजगारांना कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्‍वासन दिले.