संरक्षित सिंचनासाठी नियोजन करा - मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

मुंबई - राज्यात संरक्षित सिंचनाची व्यवस्था वाढण्यासाठी येत्या दोन महिन्यांत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे व्हावीत, यासाठी सर्व पालकमंत्र्यांनी जिल्हा स्तरावर तातडीने बैठका घेऊन आवश्‍यक ते नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी यांनी दिले. 

राज्य जल परिषदेची तिसरी बैठक मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते. बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, मुख्य सचिव सुमित मलिक आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, की राज्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करताना सर्व खोऱ्यांचे एकत्रीकरण करण्यात यावे. गोदावरी खोऱ्याच्या एकात्मिक जल आराखड्यानुसार राज्यातील इतर खोऱ्यांचे जल आराखडे तयार करण्याच्या दृष्टीने कालबद्ध नियोजन करावे. आराखडा परिपूर्ण होण्यासाठी तज्ज्ञांच्या कृती गटाने सुचविलेल्या सूचनांचा विचार करावा. तसेच जल आराखड्यास राज्य जल परिषदेची मान्यता घेण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, जेणेकरून सर्व खोऱ्यांचे जल आराखडे समान पातळीवर व एकात्मिक राहतील.