मॅनफोर्सच्या जाहिरातीवर बंदी घालण्याची रिपाइंची मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 एप्रिल 2017

मुंबई - अभिनेत्री सनी लिओन करत असलेल्या मॅनफोर्स कंडोमच्या जाहिराती या अनैतिकता आणि अश्‍लीलतेचा प्रचार करणाऱ्या, तसेच समस्त महिलावर्गासाठी अपमानजनक असल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महिला आघाडीने या जाहिरातींच्या प्रसारणावर बंदीची मागणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे.

एखाद्या कंडोमची जाहिरात करण्याला आमचा विरोध नाही; मात्र मॅनफोर्स कंडोमच्या जाहिरातीसंदर्भात आम्हाला अनेक महिलांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, ही जाहिरात सहकुटुंब पाहणे म्हणजे खूपच लज्जास्पद अनुभव असल्याचा दावा रिपाइंच्या महिला आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. उच्च भारतीय संस्कृती आणि प्राचीन काळापासून आपल्या आचार-विचारात असलेली तत्त्वे आणि नीतीमूल्ये यांचा विचार करता ही जाहिरात म्हणजे आपल्या संस्कृतीवर एक प्रकारे घाला घालण्याचा प्रकार असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. या जाहिरातील स्त्री पात्राच्या चेहऱ्यावरील बिभत्स आणि अश्‍लील भाव हे नैतिकता आणि महिलांच्या सन्मानाची पायमल्ली करणारे आहेत.

त्यामुळे आम्ही या तक्रारीद्वारे केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याला या जाहिरातीच्या प्रसारणावर बंदी घालण्याची विनंती केली आहे. तसेच संबंधित विभागाने आमच्या तक्रारीची दखल न घेतल्यास आम्ही राज्य महिला आयोगाकडेही दाद मागणार असल्याची माहिती रिपाइंच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी शीला गांगुर्डे यांनी दिली.