आझाद हुंकार : धडक मराठा; सरकारविरोधात संताप, मुंबईतील सर्वांत मोठा मोर्चा

संजय मिस्कीन
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

मुंबई 'जॅम'

 • 'एक मराठा, लाख मराठा'चा जयघोष
 • रेल्वे, रस्ते 'मराठा'मय
 • आझाद मैदानात ऐतिहासिक क्रांती
 • सरकारविरोधात संताप व्यक्त
 • मुलींचे आक्रमक भाषण

मुंबई : आजच्या क्रांतिदिनी मुंबईत मराठा मोर्चाच्या क्रांतिकारी त्सुनामीची साक्ष मुंबईने अनुभवली. 'एक मराठा, लाख मराठा', 'जय जिजाऊ जय शिवराय', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय...' अशा घोषणांनी अवघी मुंबापुरी आज दणाणून गेली होती. ऐतिहासिक आझाद मैदानात मुंबईच्या इतिहासातला सर्वांत मोठा मोर्चा म्हणून मराठा क्रांती मोर्चाची आज नोंद झाली. मध्य मुंबईत रेल्वे, लोकल व रस्त्यावर आज फक्‍त हातात भगवा झेंडा घेतलेले व 'एक मराठा, लाख मराठा'चे काळे टी-शर्ट परिधान केलेले मराठा बांधव व भगिनींचे जथ्थेच्या जथ्थे लोटत होते. मुंबईला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांवर केवळ मराठा मोर्चात सहभागी होणाऱ्या वाहनांमुळे मुंबई ते ठाणे, मुंबई ते पनवेल हे महामार्ग गर्दीने फुलून गेले होते. दक्षिण मुंबईतील तर सर्व वाहतूक ठप्प झाली होती.

मराठ्यांचा हा अखेरचा क्रांती मोर्चा संयम, शिस्त व आचारसंहितेचे तंतोतत पालन करत मुंबईत दाखल झाल्याचे नियोजनबद्ध चित्रदेखील सर्वांना चकित करणारे होते.
भायखळा येथील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा महामोर्चा सकाळी बरोबर 11 वाजता सुरू झाला. त्यापूर्वीच आझाद मैदानात मराठा मावळ्यांनी रात्रभर मुक्‍काम ठोकत आरक्षणाच्या मागणीची धग दाखवून दिली होती. दादर ते छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकांवर रात्रभर मोर्चेकरी दाखल होत होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील चौकातील वाहतूक बंद केल्याने या ठिकाणी मराठा मोर्चेकरी बसले होते, तर आझाद मैदानात भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते.

दुपारी 12.30च्या सुमारास युवतींच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा आझाद मैदानात पोचला. या वेळी काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेल्या शाळकरी व महाविद्यालयीन 11 मुली व्यासपीठावर जाताक्षणीच उपस्थितांनी जल्लोष केला. मराठा क्रांती मोर्चाचे मराठा स्वयंसेवक या भव्यदिव्य मोर्चाच्या नियोजनावर बारकाईने लक्ष ठेवून होते.

सरकारविरोधात आक्रोश
मराठा क्रांती मोर्चाच्या परंपरेप्रमाणे मोजक्‍या शाळकरी व महाविद्यालयीन युवतींची अत्यंत प्रभावी व आक्रमक भाषणे झाली. आवाज, आवेश व हातवारे करत या युवतींनी मराठ्यांच्या व्यथा व समस्या मांडल्या. मागील वर्षभरात राज्यात मराठ्यांचे 57 मोर्चे निघाले होते; मात्र सरकारने त्याची दखल न घेतल्याचा संताप या युवतींच्या भाषणातून व्यक्‍त होत होता.
प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत त्यांनी सरकारला कठोर शब्दांत सुनावले. मराठा आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी, शेतीमालाला भाव यासह मराठा समाजाच्या आर्थिक व सामाजिक समस्यांचा उद्रेक या युवतींनी शब्दातून मांडला. उपस्थित मराठा बांधवांनी त्यांच्या या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सरकारविरोधी रोष व्यक्‍त करत होते.

आक्रमक रणरागिणींचे बोल....

 • छत्रपतींचे वारस आहोत. हातात नांगर घेऊन चालवण्याची संस्कृती आहे; पण अन्यायाच्या विरोधात हातात तलवार घेऊन लढण्याची धमकदेखील आहे.
 • जिस दिन मराठा सुरू करेंगे राडा, आमच्या पोरी पण म्हणतील चला रे तलवारी काढा..!
 • ना आम्हाला सत्ता पाहिजे, ना डोक्‍यावर ताज पाहिजे... आम्हाला अवघा मराठा एक पाहिजे.
 • वाटलं नव्हतं हक्‍कासाठी लढावं लागेल, ज्यांना सत्तेत बसवलं त्यांच्याशीच भिडावं लागेल.
 • नका ठेवू वाईट नजरा जिजाऊंच्या लेकीवर, अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल मराठ्यांच्या एकीवर.
 • आरक्षण आम्हाला शिकू देत नाही, दुष्काळ बापाला पिकवू देत नाही.
 • जो मराठा हित की बात करेगा, वही महाराष्ट्र पे राज करेगा
 • फडणवीस सरकार मागण्या मान्य करा अन्यथा 'चले जाव'