होय, मराठ्यांचे मोर्चे निरागस नाहीत!

Maratha Morcha
Maratha Morcha

चार माणसे रस्त्यावर काढायची म्हटले तरी हजाराची लाल परी ओवाळून टाकावी लागते. अशा साऱ्या परिस्थितीत स्वखर्चाने लाखो लोक रस्त्यावर उतरत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात असे चित्र पहिल्यांदाच पहायला मिळत आहे. कोपर्डीची री आता राजकीय लोकांच्या कक्षेत रुंदावली आहे. त्यानुसार संधीच्या शोधात अन संधीचे सोने करण्यात तरबेज असणारी मंडळी भाया सारून कामाला लागली आहेत. "आम्हाला ते कळले होते‘, असे म्हणणारे टीव्हीवाले देखील आता पुस्तकी कयास लावत आहेत. औरंगाबादला 8 ऑगस्ट रोजी तीन लाखाच्या आसपास लोक रस्त्यावर उतरले. ज्या मोर्चातली निरागसता अनेकांना प्रेरणा देऊन गेली आणि लोन बाहेर पसरले. "तिथे होते मग इथे का नाही‘ या धर्तीवर गावोगावचे मराठे जागे केले. म्हणजे ती काही झोपली नव्हती. मात्र एका सुतात समाज जोडण्याचे आणि त्यांना एका सुरात तालात रस्त्यावर आणायचे यशस्वी प्रयत्न पुढे उस्मानाबाद, जळगाव, बीड आणि काल परवा परभणीने तडीस नेले. एक आयोजन म्हणून मराठ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मी स्वत: बीडच्या मोर्चात फक्त सहभागी नाही तर तो मोर्चा मी जागून, जगून घेतला होता. अनेक पातळ्यावर मोर्चा निरागसच होता. अनेकांना मोर्चाच्या मागच्या पुढच्या लोकांचे देणे घेणे नव्हते. त्यांचा हिशोब वेगळा होता. 

सर्वांत मोठ्या मोर्चाचे आयोजनही प्रभावी 
अनेक अनुभव आलेले लोक गर्दीवर शहारे शिंपडीत होते. असे आयोजन प्रभावी असेच होते. अनेकदा समाज जेव्हा स्वयंस्फूर्तीने अन निरागस भावनेतून रस्त्यावर उतरतो, तेव्हा नियोजन म्हणून अधिक अशी जबाबदारी नसते मात्र मोर्चाचे प्रयोजन मात्र विचार करायला लावणारे आहे. एक मजेशीर छोटासा युक्तिवाद सांगतो जेव्हा आपले मित्र समोरच्यापेक्षा अधिक असतात. तेव्हा आपला आवाज आणि अपेक्षा अधिक असतात. मग समोरच्या परिस्थितीच्या कुवतीत आणि कवेत येणाऱ्या मागण्या असोत वा नसोत. याची तमा नसते. म्हणूनच गर्दी वाढली आणि मराठा समाज ऍट्रॉसिटीत दुरुस्ती सोडून ती रद्दच करा अशी मागणी करताना दिसत होता. लोकशाहीत गर्दीला किंमत असते. कागदावर डोके मोपले जात नाहीत. मात्र यंत्रणा झुंडीला विसरत नाहीत. हे देखील एक सत्य आहे. म्हणून मोर्चे आता भल्या भल्यांना डोके खाजवायला भाग पाडत आहेत. कुणी म्हणते मराठा इतर राज्यनेतृत्व समोर आले म्हणून रस्त्यावर उतरत आहे. (सुशील कुमार शिंदे देखील मुख्यमंत्री असतानाही असा मोर्चा निघाला नाही. हे अनेकांना ठाऊक नसावे) तर कुणाला मराठा समाजाचे मागास विशेषत: आर्थिक मागासलेपण मोर्चात खेचून आणत आहे, असे वाटत आहे. मोर्चे जेवढ्या संख्येने मोठे आहे तेवढेच ते गूढ देखील आहेत. अकरा दुने बावीस पोरे खेळतात त्या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन देखील एक राजकीय इव्हेंट म्हणून भांडवल करणारे राजकीय नेते हे लाखोचे मोर्चे नजरेआड करतीलच कसे? समुद्र जिंकायला निघाल्याप्रमाणे हे मोर्चे जिल्हानिहाय आपला प्रवास करत आहेत. राज्यातीलच नाहीतर दिल्लीश्‍वराच्या माजघरात देखील मोर्चे चर्चेचे कारण बनले आहेत. जिथे भारतीय संविधान सर्वधर्मसमभावाचा मजबूत खांब उभा करते तिथेच जातीचे मांडव घातले जातात. हे अनेक बुद्धिवाद्यांना रुचणारे असूच शकणार नाही. मात्र थोडीशी गल्लत इथे अशीही होत आहे कि, असे जातीय रंगाचे जठ्ठे यापूर्वी निघाले नाहीत का? आजच यातून एकूण लोकशाही धोक्‍यात आल्यासारखे असुरक्षित वातावरण का? का तर बहुसंख्याक असणारे मराठे या रंगपंचमीत उतरले आहेत. मोर्चा संयुक्तिक कसा? अन याचे सर्व प्रकारचे फायदे कसे? याचा सारा चिठ्ठा मराठ्याकडे जात म्हणून आहे. जात म्हणून आवाहन केले की लोक जमा होतात. हा पायंडा छोट्या जात समुदायांनीच घातला. त्याचेच अनुकरण मराठ्यांनी केले. फक्त ते बहुसंख्येने अधिक असल्याने मोर्चे अजगरासारखे दिसू लागले. ज्यात आपण गिळले जाऊ काय अशी भीती इतर छोट्यांना वाटू लागली. 

अनेकांना ही गर्दी अंतर्मुख करत आहे. तिकडे डबक्‍यात बसलेले मुंबईकर तिथूनच अंदाज घेत आपली जुनीच दारू नव्या बाटलीतून वाटत आहेत. जसे आहे तसे आम्हाला मान्य करायचे नाही आम्हाला जसे वाटते तसे आम्ही दाखवू. तसेच तुम्ही पण समजायचे. यासाठी जन्म झालेल्या काही वृत्तवाहिन्या आपला रट्टा ओढत आहेत. आता कालपरवाच खूप बोलणारे एक समालोचक विचारताना म्हणतात, "मराठे कोपर्डी झाल्यावरच का निघाले? खर्डा-खैरलांजी वेळी का नाही?‘ असा बुद्धिवादी प्रश्न विचारण्यापेक्षा दलितांना मोकळ्या मनानेच का सांगत नाहीत की मराठ्यांशी राजकीय सामाजिक द्वंद्व करा म्हणून? अहो लोकशाही आहे. मराठा जात म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर येत आहेत. पुढे आणखी काही दिवस येणार आहेत. यातून अनेक अपेक्षांचे डोंगर व्यवस्थेच्या समोर येणार आहेत. अश्‍या परिस्थितीत सामाजिक स्वास्थ्य टिकवणे गरजेचे असताना पत्रकारितेत, भूमिकेत आणि जातींत अडकलेले काही पोपट मात्र ठरलेल्या मोजक्‍या पिपाण्या वाजवत आहेत हे अत्यंत दुर्दवी आहे. 

राजकीय पक्षांना जाग 
बीडचा मोर्चा निघाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष खडबडून जागे झाले असावेत. कारण मागण्यांचे काही होईल. मात्र जात म्हणून मराठा समाजचे मूल्य राजकीय आणि सामजिक व्यासपीठावर वृद्धिंगत होत आहे. जे पक्ष म्हणून राष्ट्रवादीला प्रचंड घबाड मिळवून देणारे ठरू शकेल. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्ष्यात घेता हा "पॉवर‘ शरदाच्या चांदण्यासारखा राष्ट्रवादीला मधुचंद्राच्या रात्रीप्रमाणे मोफत मिळाला तर वावगे वाटायला नको. हे न कळण्याइतके राजकीय मागास कुणी नाही. अगदी दलितनेते देखील. मोर्चे फक्त संख्येने मोठे नाहीत त्यामागचे कयास, प्रयास, सायास मोठे आहेत. लोक मोर्चा यशस्वी करून घरी जाऊन झाले काम म्हणून स्वस्थ बसत नाहीत. मोर्चातून मिळालेला आत्मविश्वास प्रसिद्धी कौतुक याचे भांडवल करून काय काय ते मिळवता येईल, याची चाचपणी करत आहेत. मग ते भांडवल मराठ्यांनी जे कमावले आहे, गावच्या पातळीवर वा आणखी कुठल्या, ते वापरणारच. काळजी फक्त एवढी की त्याचा सामाजिक स्वास्थ्याच्या आरोग्याला धोका होऊ नये. फक्त एका दिवसापुरते रस्त्यावर येऊन मराठे थांबणार नाहीत, हे बऱ्यापैकी व्यवस्थेने जाणून घ्यावे. अहो बीडच्या मोर्चाची उपस्थिती एक लाखाच्या घरात कुठल्या एका वृत्तवाहिनीने सांगितली. तर संबधित वाहिनी प्रतिनिधीस रात्रभर सप्रेम नमस्काराचे फोन होते म्हणे. म्हणजे मोर्चा जगाला दिसला पाहिजे. त्याची धग, जखम, मागण्या, संख्या सगळं सगळं अगदी जशास तसे इच्छित स्थळी पोहचते आहे काय? इथपर्यंत मराठे सावध आहेत. म्हणजे सुरवातीला निरागस वाटणारे मोर्चे तेवढे निरागस नाहीत. बरेच टक्के लोक लेकीबाळीच्या आवाहनाला ओ म्हणून गर्दीचा भाग होतात, नाही असे नाही. मात्र मोर्चा मागे कुठलीतरी चीड आहे काय? कुठला प्रतिशोध मराठ्यांच्या तप्त नजरेत आहे काय याची बऱ्यापैकी धास्ती नेमक्‍या समुदायांनी वा लोकांनी घेणे देखील अभ्यासाचा विषय होऊ शकतो. म्हणजे कुठल्या रिऍक्‍शनची ही रिऍक्‍शन आहे का? आणि असेल तर मग कुणीतरी त्याचे गुन्हेगार असतील मग त्याची शिक्षा काही आहे का? का कुठल्या बदल्यात झाले गेले गंगेला मिळाले, अशा धर्तीवर हा विसवांद संपला जाईल का? याचा विचार करावा लागणार आहे. कारण व्यवस्थेसमोरचा हा गंभीर प्रश्न आहे . मोर्चानंतर गावाकडे परतलेले मराठे, मोर्चानंतर कुठल्या दैनिकात कश्‍या बातम्या आल्या हे तपासणारे मराठे, त्या बातम्यातील कमी अधिक गुणदोष काढून त्यावर "पुढे पाठवा, जाब विचारा‘ असा तडका मारून ते मसालेदार संदेश तयार करणारे मराठे, असे विभाग पडलेले मोर्चेकरी मराठे उद्या राज्यात जिल्हानिहाय असतील. 

मोर्चाची रिऍक्‍शन 
या मोर्च्याचा रिऍक्‍शन तयार होत आहेत. अन वाट पाहत आहेत. एक संधी, कुणास ठाऊक यासाठी जात म्हणून परस्परविरोधी समजूत करून घेतलेले काही समुदाय आणि त्यांचे म्होरके यासाठी दारू ढासत असतील. कुणी कुठलेही विश्‍लेषण करत असले तरी दलितांना हे मराठ्यांचे मोर्चे रुचले आणि पचले नाहीत हेच सत्य आहे, ते मान्य करून चालले तर उद्या मराठा दलित तणाव नक्की होईल. अनेकदा सामोपचाराने मिटवले जाणारे प्रकरणे भांडवल म्हणून वापरली जातील. सर्व काही पूर्ववत होण्यापूर्वी बराच काळ भरडला जाईल. ऍट्रॉसिटीवरून आठवले आणि सुशीलकुमार शिंदे यांनी आपली ढाल यापूर्वीच पुढे केली आहे. ठाकरे बंधू ऍट्रॉसिटी वरून आपली सुभेदारी चालवत आहेत. कुठलाच मुद्दा न उरलेले राज ठाकरे देखील ऍट्रॉसिटीला आपला राजकीय अजेंडा करू शकतील. कारण मोर्च्यातली गर्दी त्यांना देखील खुणावत असणार. मात्र पूर्वी त्यांना आरक्षणावरून मराठी मने चांगली दुखावल्याचे आपण जाणून आहोत किवा ते थेट डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा हवाला देऊन आरक्षणाच्या वटवृक्षावर घाव घालतील. कारण त्यांना देखील "मनसे‘ला माणसे जोडायचे आहेत. त्यांचा पक्षप्रवास टकमक टोकापर्यंत येऊन ठेपला असल्याची टीका अनेकदा मिश्‍कील म्हणून का होईना ऐकू येते. तसे असेल तर राज ठाकरे असा काही तरी उद्योग करतील अन हात आजमावतील, असे समजण्यास हरकत नाही. 

मोर्चाच्या जन्माचे रहस्य 
मोर्च्यातून एक धग अधोरेखित झाली आहे. मराठा कुठल्यातरी हक्कावरून उपेक्षित आहे. त्याच्यावर अन्याय होतो आहे. तो कुठेतरी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा सहन करत आहे. ही भावना संख्यने अधिक असल्याने त्या भावनेचे एकत्रिकरण झाले आणि त्यातून हे मोर्चाचे अपत्य जन्मले. हे मान्य केल्यास मराठ्यांच्या या धगेच्या मुळाशी कोण आहे? याचा शोध घेणे गरजेचे होऊन बसते. मग मराठ्यांच्या दुरावस्थेला आजपर्यंतचे मराठा नेते वा त्यांचे राजकारण किती जबाबदार आहे याचाही सोक्षमोक्ष झाला तर मराठ्याचे गुन्हेगार मराठेच अधिक निघतील. यावर देखील मराठे अंतर्मुख होऊ शकतील. अन हे मोर्चे त्या मंथनाची नांदी ठरू शकतील. मोर्चे, निदर्शने तसा मराठ्यांचा प्रांत नाही. ही त्यांची घुसखोरी कुणाला दचक, कुणाला दहशत, कुणाला आव्हान वाटत असेल. मात्र मला हे मोर्चे मराठ्यासमोरच पेच उभा करतील, अशी शंका येते. कारण कायदे बदल वगैरे गर्दीच्या आवाक्‍यातले विषय नाहीत. जर तसे काही झाले नाही तर मोर्चे वांझोटे ठरतील आणि जातीय वादाचे अपत्य मात्र रांगायला लागेल .यातूनच प्रश्न वाढतील. डॉ आ.ह.साळुंखे यांनी किर्लोस्कर यांच्या लेखात 1981 साली मराठ्यांची सत्ता जाणे ही त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे असे म्हटले आहे. आजही अशीच परिस्थिती असल्याने तशी संधी मराठ्यांनी साधली असे समजायला काहींची गफलत होत आहे. कारण त्या लेखात ते मराठ्यांना आयते हवे असल्याचा स्वभाव अधोरेखित करतात. त्याला अधिक स्पष्ट करताना नातेवाईक आमदार असेल मग मला कष्ट न करता काही मिळावे, अशी अपेक्षा मराठे करतात. यापेक्षा मनगटावर विश्वास ठेवावा असे त्यात साळुंखेचे आवाहन आहे. अनेकांना 1981 चे रीडिंग आज लागू आहे असे वाटते. मात्र मला मराठ्यांचा प्रश्न वेगळा वाटतो. आपल्यासोबत लिपिक म्हणून भरती झालेला दलित सहकारी चार-दोन वर्षात आपला वरिष्ठ म्हणून बढती मिळवतो. समपात्रता असताना बाजूचा आपल्या वर जातो. म्हणून मराठा आज रस्त्यावर असू शकेल. जो कायदा दलितांना मुख्य प्रवाहात येण्यास सरंक्षक ठरावा तो मराठ्यांचा कर्दनकाळ ठरत आहे. काय म्हणून त्यांना तो कायदा दुरुस्त वा बदलून हवा आहे? 

राजकीय कयास सोयीने आणि पटतील तसे येतील. मात्र समाज म्हणून मराठा समाजाचे देखील काही दुखणे आहेत, हे नाकारता येणार नाहीच. आ.ह.साळुंखेचे आवाहन पेलण्यास मराठे तत्पर असले तरी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक वाटा कुठल्या खोट्या फिर्यादींनी व्यापलेल्या असतील, तर त्याचा विचार होणे गरजेचे आहे. मराठ्यांचे आर्थिक आरक्षण आणि राजकीय आरक्षण असे दोन सोयीचे मतप्रवाह 2009 पासून आमदारकीच्या बिरुदावल्यावरून वाहत आहेत. त्यासोबत समाज खिसडला जात आहे, समाजात चीड आहे मात्र समाजाला दिशा नाही , यातून दलितांसोबत तेढ मराठ्यांना पुढे परवडणार नाही. (मोर्चातील जातभाई उद्याचे राजकीय विरोधक म्हणून गावपातळीवर स्थानिक निवडणुकीत असतील. तेव्हा जातीचे नसताना सोबत असणारे दलित मोर्चाच्या रागातून दुरावले, तर तो मोठा फटका मराठा नेत्यांना बसेल. अन त्याचा फायदा एमआयएमसारख्या पक्षांना ग्रामीण लोकाश्रय मिळवून देतील) आज ही कायदाचा मोठा आधार दलितांना आहे, आपणास तो नाही. या भीतीने मराठा तो आधार काढून घेता येईल का? यासाठी मोर्च्याचे वज्र उगारत असू शकेल, असे वाटणारा मोठा वर्ग आज समाजात आहे. 

राजकारण्यांची भूमिका 
राज्यात मोर्चे निघताना मुस्लिम आणि संघ हे मोठे मतप्रवाह बघ्याची भूमिका घेऊन आहेत. दलितांना एमआयएमची फूस आहे. राज ठाकरेंना मराठा मिळवता आला तर त्यांचे घोडे गंगेत न्हाईल. त्यासाठी त्यांचे मनस्वी प्रयत्न चालूच झाले, तर कुणाला आश्‍चर्य नको. नाहीतरी ऍट्रॉसिटी वरून त्यांनी मागेच खडा टाकला आहे. राहिले शरद पवार. त्यांचा जुना नियम आहे सर्वांच्या चाली खेळून झाल्यावर त्यांची चाल येते. ती दुरुस्त असते. कारण अगोदरच्या इतरांच्या चालीच त्यासाठी कामी आलेल्या असतात. छोटीशी प्रतिक्रिया देऊन आपण या मोर्च्याकडे लक्ष ठेऊन आहोत हे त्यांनी राज्याला दाखवून दिले आहे. मात्र पवार यातल्या आउटपुटवर सुद्धा डोळा ठेऊन असल्याचे फक्त उद्धव ठाकरे यांना समजले असावे. म्हणूनच परभणीच्या मोर्चाच्यादिवशी शरद पवार यांनी ऍट्रॉसिटीबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अन सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकार अन पवारांची कोटी साधली आहे. शरद पवार ऍट्रॉसिटीवरून मराठ्यांची बाजू घेऊ शकत नाहीत. कारण त्यांना नामांतरातून मिळवलेला सन्मान गमवायचा नाही. त्यांना त्यात धोका यासाठी वाटत नाही कारण मराठा म्हणून जे जातमूल्य राजकीय आणि सामाजिक व्यासपीठावर अधोरेखित होत आहे, त्याची फलश्रुती राष्ट्रवादीलाच होणार हे त्यांनी ग्रहीत धरले असावे. त्यांची फलटण गर्दीत मोक्‍याच्या ठिकाणावर असल्याचे देखील बोलले जात आहे. मोर्च्याचे सबंध पक्ष, नेते, भौगालिक अश्‍या पातळ्यावर वेगवेगळे आहेत. छगन भुजबळ, एकनाथ खडसे, विनायक मेटे यांच्याशी देखील सबंध असू शकेल. ("कुठलाही गुन्हा नसताना मला शिक्षा का?‘ असा प्रश्न आपल्या वाढदिवशी एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. म्हणजे मोर्चे जर फडणवीस सरकारला धारेवर धरणार असतील तर देवेन्द्रांना नाथाभाऊ पुढच्या रांगेत लागतील आणि त्यासाठी मानाची वस्त्रे पूर्ववत दिले जातील. मोर्चाचे पीक पवार कापून घेतील ही भीती असणारे भाजप विनायक मेटे यांना देखील त्या पिकाची राखण करण्यास सांगतील. मात्र पवारांना राजकीय कोंडीत पकडेल असा मराठा अद्याप देवेंद्र आणि त्यांच्या सरकारला मिळाला नाही. राहिला प्रश्न बारामतीच्या फिरक्‍या त्यांच्या राजकीय मती पुढच्या असतात त्यांच्याबाबत अधिक काय बोलणार 2009 ला आरक्षणाचे फसलेले वा भिजलेले घोंगडे विनायकरावांची कृपा असल्याचे बोलले जाते. यापुढे स्वतंत्र विदर्भ अन स्वतंत्र मराठवाडा हे समर गीते देखील या मूक मोर्च्याच्या आरोळ्यात विरून जात आहे, जे अनेकांना अपेक्षित आहे. राज्यासाठी हे सर्व वेगवेगळे प्रकरणे आहेत मात्र या सर्व प्रकरणाची एकमेकाशी सांगड घालणारा एक मोठा राजकीय खेळाडू नाबाद 76 वर खेळत आहे. त्यामुळे मोर्च्याचे बिंग अद्याप अनेकांच्या कवेच्या बाहेर आहे. मात्र यातून जे धोके आहेत, ते स्पष्ट आहेत. ते रोखणे गरजेचे आहे. एका ताटात जेवणारी माणसे एकमेकांना पाण्यात पाहत, समाज जातीत वाटून पेटत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com