#MarathaKrantiMorcha कडकडीत बंद

#MarathaKrantiMorcha  कडकडीत बंद

औरंगाबाद - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलनादरम्यान कानडगाव (ता. गंगापूर) येथील काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या हाकेला मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. सर्वत्र कडकडीत बंद पाळून शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यासह मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. ‘बंद’ला ठिकठिकाणी हिंसक वळण लागले. रास्ता रोको, मोर्चे काढीत प्रचंड घोषणाबाजी झाली. एसटी बस फोडण्यासह पोलिसांची वाहने टार्गेट करण्यात आली. घनसावंगी (जि. जालना) येथे पोलिस ठाण्यासह झालेल्या दगडफेकीत नऊ पोलिस जखमी झाले. काकासाहेबवर अंत्यसंस्कार सुरू असताना वेगवेगळ्या घटनांत पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने उद्या (ता. २५) नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, तसेच साताऱ्यात बंदचे आवाहन केले आहे. 

आरक्षण अन्य मागण्यांसाठी परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चा निघाल्यानंतर मराठवाड्यात वेगवेगळी आंदोलने सुरू आहेत. कायगाव (ता. गंगापूर) येथे ठिय्या धरलेल्या आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. संतप्त झालेल्या आंदोलकांपैकी काकासाहेब शिंदे (वय २८) याने काल गोदावरीवरील पुलावरून उडी घेत आत्महत्या केली. त्यामुळे क्षोभ आणखी वाढला. मराठा आरक्षण मिळेपर्यंत सरकारने मेगा भरती रद्द करावी, समाजाचा संयम संपला असून, आरक्षणाचा तत्काळ निर्णय घ्यावा, यासह काकासाहेबशी संबंधित काही मागण्या करीत समन्वयकांनी आज महाराष्ट्र बंद ची हाक दिली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत कडकडीत बंद पाळण्यात आला.

मराठवाड्यातील पडसाद
नांदेड -
शहरात मोर्चा, घोषणाबाजी, वाहने, दुकाने, भाग्यनगर पोलिस ठाण्यावर दगडफेक, एक पोलिस कर्मचारी जखमी, पोलिसांकडून सौम्य लाठीमार
पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या गाड्या फोडल्या. 
लोकप्रतिनिधींच्या घरांना संरक्षण
परभणी - 
 जिल्ह्यातील सर्व आगारांतील बस फेऱ्या रद्द, सचखंडसह तीन रेल्वे गाड्या आर्धा तास रोखल्या, रेल्वे स्थानकात दगडफेकीत पाच प्रवासी जखमी.
 पूर्णा, सेलू शहरात मुख्यमंत्र्यांचा प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन, सोनपेठमध्ये अग्निशमन दलाच्या गाडीची तोडफोड
हिंगोली - 
 खानापूर चित्ता (ता. हिंगोली) येथे बासंबा पोलिसांची जीप जाळली, वसमत येथे खासगी बसची तोडफोड.
बीड - 
    परळीत दगडफेकीत दोन आंदोलक गंभीर, बीडसह केज, अंबाजोगाई, माजलगावात दगडफेकीचे प्रकार.
उस्मानाबाद -
     काही आमदारांची नावे लिहिलेल्या फलकाला चपलाचा हार घालून श्रद्धाजंली, उस्मानाबाद शहरात पाच ते सहा ठिकाणी दगडफेकीचे प्रकार, विभागाच्या ४३५ बस जागेवरच. 
लातूर - 
     लातूरमध्ये काळी पिवळी, इडली सेंटरवर दगडफेक, निलंग्यात बसवर दगडफेक, जिल्ह्यात सर्व बस बंद.
औरंगाबाद -
 जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद, आंदोलने, शहरात सकाळपासूनच बंदचे आवाहन, काकासाहेब शिंदेला ठिकठिकाणी श्रद्धांजली, पगारीया ऑटो शोरूम फोडले, शहरात दीड हजार पोलिस रस्त्यावर.

बाजारपेठ बंद; नागपुरात चक्का जाम
नागपूर - मराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र ‘बंद’चे पडसात विदर्भातील विविध जिल्ह्यांत उमटले. यवतमाळ जिल्ह्यातील काही ठिकाणी बाजारपेठा बंद ठेवून व्यापाऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला समर्थन दिले, तर नागपुरात आंदोलकांनी चक्का जाम करण्याचा प्रयत्न केला. अमरावती, गोंदिया आणि वर्ध्यात सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सोपवून आरक्षणाची मागणी केली. यवतमाळ शहरासह महागाव, उमरखेड येथे कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला. नागपूरच्या महाल, गणेश पेठ व सक्करदरा भागात आंदोलकांनी चक्का जाम करण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्याकडे जाणाऱ्या अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या.

अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे सरकारचा निषेध, शेगाव येथे शाळा व महाविद्यालये बंद
खामगाव, मलकापुरात शुकशुकाट, वाशीममधील रिसोडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

जळगाव, धुळ्यात बंदचे आवाहन
जळगाव - जिल्ह्यातील एरंडोल आणि पारोळा, अमळनेर, मुक्‍ताईनगर येथे उद्या (ता.२५) बंदचे आवाहन मराठा समाजाकडून करण्यात आले आहे. एरंडोल येथे महामार्गावर ‘चक्‍का जाम’ करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. चोपडा येथे ‘रास्ता रोको’ करण्यात येईल. जामनेर तालुक्‍यात राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध मोर्चा काढला, तर रावेरला बंद पाळण्यात आला. धुळ्यात उद्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यातील १४७ मराठा आमदारांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर जळगावहून औरंगाबाद व त्या मार्गावरून जाणाऱ्या सर्व बसफेऱ्या रद्द करण्याचा निर्णय जळगाव विभागाकडून घेण्यात आला.

नाशिकमध्ये संमिश्र प्रतिसाद; आज बंदची हाक 
नाशिक - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभर पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला नाशिकमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. उद्या (ता. २५) नाशिक जिल्हा बंदची नव्याने हाक देण्यात आली. आंदोलनाची धग कायम ठेवण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण व आमदार, खासदारांच्या निवासस्थानांसमोर ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली.

 मुंबई-आग्रा महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन  
 तीन बसेसवर दगडफेक करत आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न

सातारा जिल्ह्यात आंदोलन पेटले; उद्याही बंद
सातारा - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन करून तहसीलदार कार्यालयांवर मोर्चे काढण्यात आले. सातारा शहरातील सर्व व्यवहार आज सुरळीत असले, तरी उद्या (बुधवारी) संपूर्ण जिल्ह्यात बंद पाळण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या समितीच्या साताऱ्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आंदोलनाची धग उद्याही कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

 वाई, कोरेगाव, दहिवडीत कडकडीत बंद 
 कऱ्हाडमध्ये आंदोलकांचा ठिय्या
 मोर्चात सहभागी न होणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडण्याचा इशारा

सोलापूर जिल्ह्यात ठिय्या आंदोलन, शाळा बंद
सोलापूर - मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंद जाहीर केला, पण आषाढी एकादशीच्या वारीमुळे अद्यापही वारकरी पंढरपुरात आहेत. वारकऱ्यांचे हाल होऊ नयेत, यासाठी पंढरपुरात आलेला वारकरी त्याच्या घरी जाईपर्यंत आंदोलन न करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चान घेतला, त्यानुसार सोलापूर शहरात सर्वत्र शांतता आणि सुरळीत व्यवहार सुरू राहिले, पण राज्यातील अन्य घटनांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात मात्र अनेक ठिकाणी पडसाद उमटलेच. अनेक ठिकाणी उपोषण, ठिय्या आंदोलन झाले. जिल्ह्यातील बहुतेक सर्व शाळा बंद राहिल्या.

कोल्हापुरात संमिश्र प्रतिसाद
कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजातर्फे पुकारलेल्या क्रांती ठोक मोर्चाने शहरात आज संमिश्र बंद स्थिती राहिली. दुचाकी फेरीने दुपारनंतर दुकाने पटापट बंद झाली. शाळाही बंद होत्या. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण व खेड वगळता बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबई- गोवा महामार्गावर खारेपाटण येथे टायर पेटवून रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प होती.  जिल्ह्यात बंद कडकडीत पाळण्यात आला. शिरोळ, खानापूर तालुक्‍यात काही ठिकाणी बसवर दगडफेक करण्यात आली. कवठेमहांकाळ तालुक्‍यात रास्ता रोको झाला. टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात आला. इस्लामपूरमध्ये पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली.

नगर जिल्ह्यात बस फोडल्या
नगर - नगरमध्ये माळीवाडा आणि शेवगाव बसस्थानकात प्रत्येकी एक बस फोडली. तसेच वडगावपान (ता. संगमनेर) येथे आंदोलकांनी बस पेटविली. जामखेड, श्रीगोंदे तालुक्‍यात रास्तारोको केल्याने बसवाहतूक तुरळक होती यामुळे प्रवाशांचे हाल झाले. राहुरी, श्रीरामपूर येथे व्यवहार कमी झाले. 
शाळा, महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांना घरी पाठविले
उद्या नगर शहर बंद आणि शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर रास्तारोकोचा इशारा

  मराठा आंदोलनात...
जिल्हावार अहवाल पाठविण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश
राज्यात १८२ बस फोडल्या; अंदाजे ४९ लाखांचे नुकसान
विदर्भात ‘बंद’ला अल्प प्रतिसाद
अकोल्यात ठिय्या आंदोलन
बुलडाण्यात शाळांना सुटी
वाशीममध्ये कडकडीत बंद
कोल्हापूरमध्ये रात्रभर ठिय्या
कोकण व नाशिकमध्ये बंद’ला संमिश्र प्रतिसाद
सोलापुरात शाळा बंद
खानदेशात ‘रास्ता रोको’
नगर जिल्ह्यात ‘चक्का-जाम’, बस पेटविली

मराठवाड्यात दाहकता...
सर्वत्र बसफेऱ्या रद्द
औरंगाबाद जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद
काकासाहेब शिंदेवर अत्यंसंस्कार
खासदार चंद्रकांत खैरे यांना धक्काबुक्की
आमदार सुभाष झांबड यांना हुसकावले
कायगावात अग्निशामक दलाची गाडी पेटविली
कायगावमध्ये पोलिसांचा लाठीमार; अश्रुधुराचा वापर 
कायगाव पुलावर बंदोबस्तावेळी पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू
घनसांगवीत (जि. जालना) पोलिस ठाणे, तहसील कार्यालय, पंचायत समितीसह विविध शासकीय कार्यालयांवर दगडफेक; संचारबंदी
परभणीत तीन रेल्वे गाड्या रोखल्या
हिंगोली जिल्ह्यात पोलिसांची जीप जाळली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com